तिरुवनंतपूरम; वृत्तसंस्था : स्मृती मानधना (80) आणि शफाली वर्मा (79) यांची 162 धावांची विक्रमी सलामी आणि फिरकीपटू वैष्णवी शर्माच्या (2/24) प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने चौथ्या टी-20 सामन्यात श्रीलंकेचा 30 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 4-0 अशी अभेद्य आघाडी घेतली.
स्मृती आणि शफाली यांनी पहिल्या विकेटसाठी 162 धावांची विक्रमी भागीदारी करत भारताला 2 बाद 221 या सर्वोच्च धावसंख्येपर्यंत पोहोचवले. प्रत्युत्तरात 222 धावांच्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेला 20 षटकांत 6 बाद 191 धावापर्यंत मजल मारता आली. हसिनी परेरा (20 चेंडूंत 33 धावा) आणि कर्णधार चमारी अटापट्टू (37 चेंडूंत 52 धावा) यांनी फटकेबाजी करत डावाला गती दिली. मात्र, मधल्या फळीतील फलंदाज ढेपाळल्यामुळे श्रीलंकेचा डाव कोलमडला. वैष्णवी शर्माने 4 षटकांत केवळ 24 धावा देत 2 महत्त्वपूर्ण बळी मिळवले. तिने सेट झालेल्या चमारी अटापट्टू व हर्षिता समरविक्रमा (20) यांना बाद करून सामन्याचे चित्र बदलले. वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डीने 42 धावांत 2 बळी घेत वैष्णवीला चांगली साथ दिली. मालिकेतील पाचवा आणि अंतिम टी-20 सामना उद्या मंगळवार, दि. 30 रोजी खेळवला जाणार आहे.
हा खेळ आकड्यांचा!
162 - स्मृती मानधना-शफाली वर्मा यांच्यात झालेली 162 धावांची सलामीची भागीदारी ही भारतासाठी कोणत्याही विकेटसाठी झालेली सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. या जोडीने 2019 मधील वेस्ट इंडिजविरुद्धचा (ग्रॉस इस्लेट) 143 धावांच्या भागीदारीचा आपलाच विक्रम मोडला.
250 - रिचा घोषने अवघ्या 16 चेंडूंमध्ये नाबाद 40 धावा कुटताना 250 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. 10 पेक्षा जास्त चेंडू खेळणार्या भारतीय फलंदाजांमध्ये हा दुसरा सर्वोच्च स्ट्राईक रेट ठरला आहे.
3107 - स्मृती आणि शफाली यांनी एकत्रित 3 हजारपेक्षा अधिक धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. महिला टी-20 क्रिकेटमध्ये 3,000 भागीदारी धावा पूर्ण करणारी ही पहिलीच जोडी ठरली आहे.
1703 - स्मृतीने 2025 या कॅलेंडर वर्षात आतापर्यंत सर्वाधिक 1,703 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत.
भारतीय महिला : 20 षटकांत 2 बाद 221. (स्मृती मानधना 48 चेंडूंत 11 चौकार, 3 षटकारांसह 80, शेफाली वर्मा 46 चेंडूंत 12 चौकार, 1 षटकारासह 79, रिचा घोष नाबाद 40, हरमनप्रीत कौर नाबाद 16).
श्रीलंकन महिला संघ : 20 षटकांत 5 बाद 191. (चमारी अटापट्टू 37 चेंडूंत 52. हसिनी पेरेरा 20 चेंडूंत 33, निलाक्षिका 11 चेंडूंत नाबाद 23. अरुंधती, वैष्णवी प्रत्येकी 2 बळी).