विशाखापट्टणम; वृत्तसंस्था : रिचा घोषने 77 चेंडूंत 94 धावांचा झंझावात साकारत अडीचशे धावांचा टप्पा सर करून दिल्यानंतरही दक्षिण आफ्रिकन महिला संघाने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत निकराने झुंज देत भारताच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास अक्षरश: हिसकावून घेतला. प्रारंभी, भारताचा डाव 49.5 षटकांत सर्वबाद 251 धावांवर आटोपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 48.5 षटकांत 7 बाद 252 धावांसह सनसनाटी विजय मिळवला.
विजयासाठी 252 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ अवघ्या 81 धावांत तंबूत परतला होता. मात्र, ट्रियॉनने लॉरासह सहाव्या गड्यासाठी 61 धावांची, तर नॅदिने क्लेर्कसह सातव्या गड्यासाठी 69 धावांची भागीदारी साकारत भारताचा संघर्ष खर्या अर्थाने संपुष्टात आणला. ट्रियॉन सातव्या गड्याच्या रूपाने बाद झाल्यानंतर भारताला अंधुकशी आशा होती. मात्र, नॅदिनेने 54 चेंडूंत 84 धावांची आतषबाजी करत भारताच्या संघर्षाला पूर्णविराम दिला.
तत्पूर्वी रिचा घोषने आठव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत 94 धावांचा पॉवरफुल्ल धमाका साकारत भारताला 251 धावांपर्यंत मजल मारून दिली. भारताने 6 बाद 102 या बिकट स्थितीतून केवळ रिचाच्या धमाकेदार खेळीमुळे अडीचशे धावांचा टप्पा सर केला. रिचाने 77 चेंडूंत 11 चौकार व 4 उत्तुंग षटकारांसह 94 धावा चोपल्या.
स्मृती मानधनाने वन-डे क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात एकूण 973 धावा जमवत 28 वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम मोडीत काढला. तिने ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कला मागे टाकले, मात्र तिची ही खेळी संघाला विजय मिळवू देऊ शकली नाही.