

बंगळूर; वृत्तसंस्था : आगामी महिला वन डे विश्वचषकापूर्वीच्या दुसर्या आणि शेवटच्या सराव सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (69) नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडवर डकवर्थ-लुईस (डीएलएस) नियमानुसार चार गडी राखून विजय मिळवला. पहिल्या सराव सामन्यात इंग्लंडविरुद्ध झालेल्या मोठ्या पराभवातून सावरत भारताने येथे किवी संघाला सर्वच आघाड्यांवर धूळ चारली.
या लढतीत न्यूझीलंडने 8 बाद 232 धावा केल्या. त्यानंतर भारतासमोर डकवर्थ लुईस सिस्टीमनुसार, 237 धावांचे सुधारित लक्ष्य होते. भारताने हे लक्ष्य 10 चेंडू आणि 4 गडी राखून सहज पार केले. हरमनप्रीत कौरने आपल्या खेळीत 8 चौकारांसह 86 चेंडूंमध्ये 69 धावांची शानदार खेळी केली. तिने हरलीन देओलसोबत तिसर्या विकेटसाठी 132 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. हरलीनने 10 चौकारांच्या मदतीने 79 चेंडूंमध्ये 74 धावांची महत्त्वाची खेळी साकारली आणि नंतर ती ‘रिटायर्ड आऊट’ झाली. तत्पूर्वी, भारताच्या सलामीवीर प्रतिका रावळ (15) आणि उमा क्षेत्री (38) यांनी 54 धावांची भागीदारी साकारली.
पावसामुळे षटके कपात करण्यात आलेल्या या सामन्यात न्यूझीलंडची कर्णधार सोफी देव्हाईन हिने 9 चौकारांसह 54 धावांची खेळी केली, तर मॅडी ग्रीनने जलद आणि नाबाद 49 धावा करून किवी संघाला 8 बाद 232 पर्यंत पोहोचवले. भारताची वेगवान गोलंदाज क्रांती गौडने 8 व्या षटकात न्यूझीलंडची अवस्था 38 धावांत 2 गडी अशी केली होती. मात्र, अमेलिया केर (40) आणि देव्हाईन यांच्यातील 91 धावांच्या भागीदारीने डाव सावरला. भारतासाठी गोलंदाजीत श्री चरणने सर्वाधिक 3 बळी (49 धावांत 3 बळी) घेतले, तर गौड आणि अरुंधती रेड्डीने प्रत्येकी दोन गडी बाद केले. भारताचा विश्वचषकातील पहिला सामना मंगळवारी (30 सप्टेंबर) स्पर्धेचे सह-यजमान असलेल्या श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.