IND vs SL : वंडरबॉय वँडरसेचा ‘षटकार’

फिरकीच्या जाळ्यात अडकली टीम इंडिया; श्रीलंका 32 धावांनी विजयी
Sri Lanka won by 32 runs
विराटची विकेट घेतल्यानंतर वँडरसेने जल्लाेष केला.File Photo
Published on
Updated on

कोलंबो : पहिला सामना बरोबरीत सुटल्यानंतर दुसर्‍या वनडे मध्ये फिरकीपटू जेफ्री वँडरसे याने घेतलेल्या 6 विकेटच्या जोरावर श्रीलंकेने भारताला 32 धावांनी पराभूत केले आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर अविष्का फर्नांडो (40), कामिंडु मेंडिस (40) आणि दुनिथ वेल्लालागे (39) या फलंदाजांच्या चिवट खेळीच्या जोरावर श्रीलंकेने 240 धावांपर्यंत मजल मारली होती. हे आव्हान पेलताना कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या बळावर भारतीय डावाची सुरुवात दमदार झाली. पण त्यानंतर वँडरसे याने भारतीय फलंदाजांची अक्षरश: पळता भूई थोडी केली. भारताचा डाव 208 धावांत आटोपला तर वँडरसेने 33 धावांत 6 बळी टिपले. पहिला सामना बरोबरीत सुटला, तर आता दुसरा सामना जिंकून श्रीलंकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील शेवटचा सामना उद्या (बुधवारी) होणार आहे.

वँडरसेच्या वादळात भारतीय फलंदाजी उद्ध्वस्त

श्रीलंकेने केलेल्या 240 धावांना प्रत्युत्तर देताना रोहित शर्मा आणि शुबमन गिल जोडीने दमदार सुरुवात करत 97 धावांची सलामी दिली. रोहितने 44 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 64 धावा केल्या. पण जेफ्री वँडरसेच्या वादळाने भारताचा डाव उधळला. रोहित रिव्हर्स स्वीप खेळताना बाद झाला. त्यानंतर शुबमन गिल (35), विराट कोहली (14), शिवम दुबे (0), श्रेयस अय्यर (7) आणि के एल राहुल (0) यांना वँडरसेने तंबूत पाठवले. त्यानंतर वँडरसेला बराच काळ गोलंदाजी न दिल्यामुळे अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर खेळपट्टीवर स्थिरावले. या दोघांनी 38 धावांची भागीदारी केल्यानंतर अक्षर पटेल बाद झाला. 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 44 धावा करणार्‍या अक्षरला कर्णधार असलंकाने बाद केले. पाठोपाठ वॉशिंग्टन सुंदरही 15 धावांवर बाद झाला. त्यानंतर सिराज 4 धावांवर बाद झाला. अखेर अर्शदीप सिंह एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावचीत झाला आणि भारताचा डाव 208 धावांवर आटोपला.

तत्पूर्वी, श्रीलंकेने पहिल्याच चेंडूवर पाथुम निसंकाची विकेट गमावली. दुसरा सलामीवीर अविष्का फर्नांडो आणि कुसल मेंडिस या जोडीने संघाला 74 धावांची भागीदारी करून दिली. वॉशिंग्टन सुंदरने ही जोडी फोडत अविष्का फर्नांडो आणि कुसल मेंडिस यांना सलग दोन षटकांत माघारी धाडले. त्यानंतर अक्षर पटेलने समरविक्रमाला 14 धावांवर, कुलदीप यादवने जनीथ लियानागेला 12 धावांवर तर सुंदरने कर्णधार चरिथ असलंकाला 25 धावांवर बाद केले. त्यामुळे श्रीलंकेची अवस्था 35व्या षटकापर्यंत 6 बाद 136 झाली होती. नंतर दुनिथ वेल्लालागे आणि कमिंडु मेंडिस या दोघांनी श्रीलंकेचा डाव सावरला. 72 धावांची भागीदारी करणार्‍या दुनिथ वेल्लालागे कुलदीपने 39 धावांवर तंबूत पाठवले. कमिंडू मेंडिसने 40 धावा केल्या. तर अकिला धनंजया 15 धावांवर बाद झाला. त्यामुळे श्रीलंकेने 9 बाद 240 धावा केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news