

तिरुवनंतपुरम; वृत्तसंस्था : पहिल्या 2 सामन्यांत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर, आत्मविश्वास उंचावलेला भारतीय महिला संघ शुक्रवारी (दि. 26) होणार्या तिसर्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेविरुद्ध विजयाची हॅट्ट्रिक साधत 5 सामन्यांची मालिका खिशात टाकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. येथील लढतीला सायंकाळी 7 वाजता सुरुवात होईल. विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या 2 सामन्यांत भारताने अनुक्रमे 8 आणि 7 गडी राखून दणदणीत विजय नोंदवले आहेत. श्रीलंकेविरुद्ध गेल्या 11 टी-20 सामन्यांतील भारताचा हा नववा विजय असून, यावरून भारतीय संघाचे वर्चस्व अधोरेखित झाले आहे. श्रीलंकेने भारतावर अखेरचा विजय जुलै 2024 मध्ये डम्बुला येथे मिळवला होता.
भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून प्रत्येक सामन्यात नवनवे खेळाडू आपली छाप पाडत आहेत. पहिल्या सामन्यात जेमिमा रॉड्रिग्जने शानदार फलंदाजी केली, तर दुसर्या सामन्यात सलामीवीर शफाली वर्माने डावाला आकार दिला. गोलंदाजीमध्ये फिरकीपटूंनी श्रीलंकेला पहिल्या दोन सामन्यांत 121 आणि 128 धावांवर रोखून धरले. एन. श्री चरणी, वैष्णवी शर्मा आणि क्रांती गौड या युवा गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत आपली जबाबदारी चोख पार पाडली. अनुभवी दीप्ती शर्माच्या अनुपस्थितीत स्नेह राणाने दुसर्या सामन्यात अवघ्या 11 धावांत 1 बळी घेत आपली उपयुक्तता सिद्ध केली.
पहिल्या सामन्यात भारताने 5 झेल सोडले होते, मात्र दुसर्या सामन्यात क्षेत्ररक्षकांनी कमालीची सुधारणा दाखवली. विशेषतः तीन फलंदाजांना धावबाद करून भारताने श्रीलंकेच्या डावाला खिंडार पाडले. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली संघ हीच लय कायम राखण्यासाठी उत्सुक आहे.
या मालिकेत सलग पराभवांमुळे श्रीलंकेचा संघ दबावाखाली आहे. कर्णधार चमारी अटापट्टू बाद झाल्यानंतर श्रीलंकेची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. दुसर्या सामन्यात त्यांनी 26 धावांत 6 गडी गमावले. आम्हाला मधल्या षटकांत चांगली फलंदाजी करण्याची गरज आहे आणि किमान 150 धावांचा टप्पा गाठणे आवश्यक आहे, असे अटापट्टूने कबूल केले आहे.
स्थळ : तिरुवनंतपुरम
वेळ : सायं. 7.00 वा. पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस् नेटवर्क