

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ आफ्रिका येथील किंग्जमीड येथे झालेल्या पहिल्या टी- २० सामन्यात भारताने आफ्रिकेला धोबी पछाड दिला. साऊथ आफ्रिकेसमोर 203 धावांचे आव्हान भारताने ठेवले होते. हे आव्हान पुर्ण करताना साऊथ आफ्रिकन फलंदाजांची पुरती दमछाक झाली. भारताच्या वरुण चक्रवर्ती व रवी बिष्णोई या दोन फिरकीपटूंनी लागोपाट बळी घेत साऊथ आफ्रिकेच्या फलंदाजांना लोटांगण घालण्यास भाग पाडले. जेराल्ड कोएत्झी याने खेळ सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र भारताने 141 धावात आफ्रिकेचा डाव गुंडाळला.
भारताने आफ्रिकेच्या सर्व फलंदाजांना 17.5 षटकात 141 धावांवर तंबूत परतले. भारताच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केल्याने आफ्रिकेच्या फलंदाजाना जखडून ठेवले होते. वरुण चक्रवर्ती व रवी बिष्णोई यांच्या फिरकीने एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेले. अवेश खान याने केशव महाराज याला बाद करत खेळ संपवला.
संजू सॅमसन हा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सलग दोन शतके झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने किंग्समीडच्या ऐतिहासिक मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अवघ्या 47 चेंडूंत कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. बाद होण्यापूर्वी संजूने 50 चेंडूंत 107 धावांची स्फोटक खेळी खेळली, ज्यात सात चौकार आणि 10 षटकारांचा समावेश राहिला.