पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने दमदार कमबॅक केले आहे. पहिल्या डावात अवघ्या ४६ धावांपर्यंतच मजल मारलेल्या संघाने दुसर्या डावात न्यूझीलंडची दमछाक केली आहे. आज ( दि. १९) सामन्याच्या चौथ्या दिवशी सरफराज खान याने झळकावलेल्या शानदार दीड शतकानंतर ऋषभ पंत ( Rishabh Pant) याने झुंझार खेळी करत १०५ चेंडूत ९९ धावांची खेळी केली. अवघ्या एका धावेने त्याचे शतक हुकले. विशेष म्हणजे, दुसऱ्या दिवशी यष्टीरक्षण करताना दुखापत झाल्याने पंतला मैदान सोडावे लागले; पण आज त्याने दुखापतीवर मात करत झुंझार शतकी खेळी करत भारताला आघाडी मिळवून दिली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी यष्टीरक्षण करताना पंतला दुखापत झाली होती. रवींद्र जडेजाच्या चेंडूवर डेव्हॉन कॉनवेचा चेंडू चुकल्याने पंतला दुखापत झाली होती. विशेष म्हणजे चेंडू थेट त्याच्या उजव्या पायाला लागला. डिसेंबर २०२२ मध्ये कार अपघातात पंतला गंभीर दुखापत झाली होती, तेव्हा त्याच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. जडेजाचा चेंडू स्टंप चुकला आणि पंतच्या उजव्या पायाला लागला. दुखापतीमुळे पंत फिजिओच्या मदतीने मैदानाबाहेर गेला. त्यानंतर तिसऱ्या दिवशीही पंत विकेटकीपिंगसाठी आला नाही आणि त्याच्या जागी ही जबाबदारी ध्रुव जुरेलने यष्टीरक्षण केले होते.
चौथ्या दिवशी पंत फलंदाजी करणार का याबाबत साशंकता होती. मात्र तो मैदानावर उतरला आणि त्याने दमदार फलंदाजी करत सरफराज खानबरोबर चौथ्या विकेटसाठी आतापर्यंत ११३ धावांची भागीदारी केली. या दोघांच्या खेळीमुळे भारताने या सामन्यात कमबॅक केले. मात्र, चौथ्या दिवशीही पावसाने सामन्यात व्यत्यय आणला आणि सामना थांबवावा लागला. सामना थांबला तोपर्यंत भारताने दुसऱ्या डावात 3 बाद 344 धावा केल्या होत्या. सर्फराज 125 धावावर तर पंत 53 धावावर खेळत होते.
अर्धशतक झळकावून पंतने माजी भारतीय फलंदाज फारुख इंजिनियर यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 62 डावांमध्ये 18 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. फारुख इंजिनिअर यांनी कसोटीत 87 डावांमध्ये 50 पेक्षा जास्तवेळा 18 धावा केल्या आहेत. या यादीत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आघाडीवर असून त्याने १४४ कसोटीतील 39 डावांमध्ये 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
५० पेक्षा अधिक धावा करणारे भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज
फलंदाज सामने अर्धशतक
महेंद्रसिंग धोनी १४४ ३९
फारुख इंजिनियर ८७ १८
ऋषभ पंत ६२ १८
सय्यद किरमाणी १४२ १४
पंतने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात आतापर्यंत तीन षटकार मारले आहेत. भारतासाठी कसोटीत सर्वाधिक षटकार मारणारा तो सहावा फलंदाज ठरला आहे. आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ६२ षटकार ठोकले आहेत. या बाबतीत त्याने कपिल देवलाही मागे टाकले आहे. कपिल देवने कसोटी क्रिकेटमध्ये ६१ षटकार मारले होते. कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे ज्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 90 षटकार ठोकले, भारतीय कर्णधार रोहित शर्मा 88 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे.