टीम इंडिया चॅम्पियन! रोमांचक सामन्यात न्यूझीलंडचे कडवे आव्हान काढले मोडीत

IND vs NZ CT Final Champions Trophy : जड्डूचा विजयी चौकार
IND vs NZ CT Final Champions Trophy
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs NZ CT Final Champions Trophy : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवून भारतीय संघाने तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव केला. यासह, भारताने सातव्यांदा आयसीसी स्पर्धा जिंकली. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात, न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 गडी गमावून 251 धावा केल्या; प्रत्युत्तरात, भारताने 6 चेंडू शिल्लक असताना रोमांचक विजय मिळवला. भारताने 49 षटकांत 6 गडी गमावून 254 धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजाने विजयी चौकार मारला.

252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाला रोहित शर्मा आणि शुभमन गिलने चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी झाली. 50 चेंडूत 31 धावा करून गिल बाद झाला. त्यानंतर अवघ्या दोन चेंडूत फक्त एक धाव काढल्यानंतर विराट कोहली एलबीडब्ल्यू झाला. 83 चेंडूत 76 धावा करून रोहित पॅव्हेलियनमध्ये परतला. श्रेयस अय्यरने 62 चेंडूत 48 धावांची खेळी केली. त्याने अक्षरसोबत 61 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. पण 39 व्या षटकात सँटनरने अय्यरला बाद केले. त्यानंतर 40 चेंडूत 29 धावा करून अक्षर पॅव्हेलियनमध्ये परतला. हार्दिक पंड्या 18 चेंडूत 18 धावा काढून बाद झाला. त्याला काइल जेमीसनने बाद केले. रवींद्र जडेजा आणि राहुल यांनी अखेर टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

न्यूझीलंडने केल्या 251 धावा

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठी 252 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर किवी संघ 50 षटकांत सात विकेट गमावून 251 धावा करू शकला. शेवटच्या पाच षटकांत 50 धावा फटकावल्या. यामध्ये मायकेल ब्रेसवेलने सर्वात मोठे योगदान दिले. त्याने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. ब्रेसवेलने 40 चेंडूंत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 53 धावांची नाबाद खेळी केली. याशिवाय डॅरिल मिशेलने 63 आणि ग्लेन फिलिप्सने 34 धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. जडेजा, शमीने एक-एक विकेट घेतली. एक खेळाडू धावबाद झाला.

चांगल्या सुरुवातीनंतर न्यूझीलंड बॅकफुटवर

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, न्यूझीलंडने विल यंग आणि रचिन रवींद्र यांच्या संयमी फलंदाजीमुळे चांगली सुरुवात केली. दोघांनी अर्धशतकी भागिदारी केली. त्यानंतर 57 धावांवर यंग (15 धावा) बाद झाला. यानंतर, फटकेबाजी करणारा रचिन 29 चेंडूत 37 धावा करून माघारी परतला. त्याच वेळी, अनुभवी केन विल्यमसन फक्त 1 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अशाप्रकारे न्यूझीलंडने अवघ्या 75 धावांत 3 विकेट गमावल्या.

डॅरिल मिशेलची संघर्षपूर्ण खेळी

संकटाच्या काळात डॅरिल मिशेलने न्यूझीलंडसाठी लढाऊ खेळी केली. त्याने भारतीय फिरकी गोलंदाजांविरुद्ध धाडसी फलंदाजी केली आणि एका टोक धरून ठेवले. मिचेलने 91 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 101 चेंडूंचा सामना केल्यानंतर तो 63 धावा काढून बाद झाला. त्याने त्याच्या डावात 3 चौकार मारले. त्याच्या खेळीदरम्यान, त्याने ग्लेन फिलिप्ससोबत पाचव्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी केली.

भारतीय फिरकीपटूंचे जाळे

वरुण चक्रवर्तीने 10 षटकांत 45 धावा देत 2 बळी घेतले. त्याने यंग आणि फिलिप्सचे आऊट घेतले. रवींद्र जडेजाने किफायतशीर गोलंदाजी केली. या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने 10 षटकांत 30 धावा देत 1 बळी घेतला. अक्षर पटेलने 8 षटके टाकली ज्यात त्याला एकही विकेट घेता आली नाही. त्याने 38 धावा दिल्या. कुलदीप यादवने 40 धावा देऊन 2 बळी घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news