

ओल्ड ट्रॅफर्ड कसोटीत विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधायच्या भारताच्या आशा सामन्याच्या तिसर्या दिवशीच मावळल्या आहेत आणि आता भारताचे उद्दिष्ट असेल ते सामना वाचवून मालिकेतील पराभव टाळायचे. शेवटचा चेंडू टाकल्याशिवाय कुठचाही सामना संपत नाही, हे जरी खरे असले, तरी 186 धावांच्या पिछाडीवरूनआघाडी घेऊन सामना जिंकायचे भगीरथ प्रयत्न क्वचितच साधले जातात. भारत ब्रिटनमुक्त व्यापाराच्या करारात भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडमध्ये मुक्त धावा द्यायचे कलमही घातले असावे, अशा स्वरूपात आपल्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली. इंग्लंडच्या गोलंदाजांना पहिल्या दिवशी ढगाळ हवा, खेळपट्टीतील दमटपणाचा फायदा मिळाला हे सर्व मान्य आहे; पण भारतीय गोलंदाजांनी बळी मिळत नसताना धावा रोखायचे प्रयत्न केल्याचे अथवा खेळाची गती कमी करायचे कुठचेही प्रयत्न केले नाहीत हेही तितकेच खरे. हुकमी एक्का बुमराहवर नेहमीप्रमाणे आशा होत्या; पण त्याने उत्तम गोलंदाजी केली, तरी त्याने बळी घेण्याचा आपला नेहमीचा वाटा उचलला नाही आणि पर्यायाने भारताच्या गोलंदाजीचा दबदबा दिसला नाही.
अर्थात एकटा बुमराह तरी किती दिवस पुरणार? प्रत्येक सामन्यात त्याने पाच बळी मिळवायची आशा आपण ठेऊ शकत नाही. सिराजच्या वर्कलोड मॅनेजमेंटचा कुणी विचार करत नसले, तरी चौथ्या सामन्यात अथक प्रयत्न करून त्याची दमणूक झाली आहे. बुमराहच्या पायाला किंचित दुखापत झाल्याची बातमी आल्यानंतर त्याच्या गोलंदाजीवर काय परिणाम होतो, हे बघावे लागेल. अँडरसन एंडकडून चेंडू थोडा खाली बसत असल्याने थोडीफार आपल्या गोलंदाजांना मदत मिळाली; पण तरी ही खेळपट्टी अजूनही फलंदाजीचे नंदनवन आहे.
‘ओल्ड ट्रॅफर्ड’ला तीन फिरकीपटू घ्यायचे का, चार जलदगती गोलंदाज घ्यायचे या सामन्यापूर्वीच्या संघ निवडीच्या प्रश्नाचे उत्तर भारताला दुसर्या दिवशी उपहारानंतरच्या जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरच्या स्पेलने दिले. भारताने दुसरा नवा चेंडू घ्यायचे थोडी षटके टाळून सुंदर आणि जडेजाची गोलंदाजी चालू ठेवली. इंग्लंडचे फलंदाज भुताला घाबरत नसतील इतके अजूनही फिरकी गोलंदाजीला घाबरून असतात. कुलदीपची उणीव भासेल का? याचे उत्तर चौथ्या दिवसाच्या आधीच मिळाले आहे. वॉशिंग्टन सुंदरला त्याच्या उंचीने चेंडूला जी ड्रिफ्ट मिळत होती, त्याने पोपला सतावले आणि ब्रूकला फसवले. उपहारापर्यंत इंग्लंडने एकही गडी न गमावल्याने सामना भारतापासून दूर चाललेला असताना या दोन फिरकीपटूंनी इंग्लंडच्या धावांवर ब्रेक लावला आणि वॉशिंग्टन सुंदरने पोप आणि ब्रूकला लागोपाठ बाद करून भारताला सामन्यात टिकून राहण्याची अंधुकशी आशा दाखवली होती; पण रूट आणि स्टोक्सने त्याच्यावर पाणी फेरले.
आपल्या जलदगती गोलंदाजांना यश मिळत नसताना वॉशिंग्टन सुंदरची आठवण गिलला इंग्लंडच्या डावाची 68 षटके झाल्यावर झाली. इंग्लंडने तोपर्यंत धावांची सरासरी 4.48 राखली होती. जडेजा आणि सुंदरने पुढची 22 षटके टाकत ती सरासरी सव्वाचारपेक्षा कमी आणली आणि मुख्य म्हणजे दोन बळी मिळवले. नवा चेंडू अजून किती लांबवायचा हा निर्णय गिलला घ्यायचा होता. दहा षटके लांबवून घेतलेल्या नव्या चेंडूवर भारताला मोठी आशा होती. नवा चेंडू सिराजने हाती घेतला तेव्हा सिराज आणि बुमराह तो हाताळतील, असा अंदाज होता; पण बुमराहने फक्त एक षटक टाकल्यावर त्याच्या बारीकशा दुखापतीने त्याच्या जागी अंशुल कंबोजला नवा चेंडू पुन्हा मिळाला. सर्वच फासे भारताच्या विरुद्ध पडत होते.
जो रूट महान फलंदाज होताच पण बॅझबॉल खेळातसुद्धा धावांचा रतीब घालत तो आजही जागतिक क्रिकेटमध्ये उभा आहे. आपले शतक पूर्ण करत एकाच सामन्यात द्रविड, कॅलिस आणि पाँटिंगच्या धावांचा विक्रम मोडत तो सचिन तेंडुलकरला आव्हान द्यायला दुसर्या क्रमांकावर पोहोचला आहे. संघाचा आधारस्तंभ कसा असावा, तर जो रूटसारखा, घरातल्या कर्त्या पुरुषासारखे त्याचे संघातील स्थान आहे आणि इंग्लंडची फलंदाजी त्याच्या भोवती गुंफली आहे. जो रूटने आपल्या 157 व्या सामन्यात या 13,409 धावा काढल्या आहेत. तेंडुलकरपासून तो फक्त 2,518 धावा दूर आहे. भारताच्या दुसर्या क्रमांकाच्या धावांचा विचार केला, तर तो थेट तेंडुलकरपेक्षा 6 हजारांनी कमी विराट कोहलीचा (9230) आहे. थोडक्यात सांगायचे तर तेंडुलकर, कोहली आणि रूटसारखे चौथ्या क्रमांकाचे खेळाडू संघाचे तारणहार असतात. शुभमन गिलने आपणहून चौथा क्रमांक घेतला आहे. पहिल्या दोन कसोटींत त्याने सुरेख फलंदाजी केली; पण ही कसोटी वाचवायची असेल, तर या दिग्गजांसारखे त्याने चौथ्या क्रमांकाला साजेशी फलंदाजी दुसर्या डावात करणे गरजेची आहे.
टी-20 च्या मुशीत चौथ्या क्रमांकाचे खेळाडू तयार होऊ शकत नाहीत, याचा ‘बीसीसीआय’ने विचार करायला हवा. ओली पोप आणि जो रूटने सकाळी लखलखीत उन्हात खेळ चालू केला, तेव्हा भारताला पहिली गरज होती ती ही जोडी फोडण्याची. दिवसाची सुरुवात शार्दूल ठाकूरने करायला लागली. कारण, बुमराहला एंड बदलून द्यायचा होता. पोप आणि रूटला भारताचा कोणताही गोलंदाज वेसण घालू शकत नव्हते. डावाच्या जवळपास प्रत्येक षटकात ते चौकार वसूल करत होते. या सामन्यात अंशुल कंबोजकडून अपेक्षा होत्या; पण दुसर्या डावातही त्याचा वेग मध्यमगती गोलंदाजीच्या आसपासच रेंगाळत आहे. त्याला ना वेगाने ना टप्प्याने गोलंदाजांवर दडपण आणण्यात यश मिळत आहे. शार्दूल ठाकूर भागीदारी मोडायला कायम उपयोगी पडल्याचा इतिहास आहे; पण त्यालाही इंग्लंडचा अनुभव असून यश मिळाले नाही. अशा परिस्थितीत बळी कोण मिळवून देणार हा प्रश्नच आहे. सर्व शक्यतांचा सकारात्मक विचार केला, तरी कर्णधार गिलने मालिकेच्या आधी म्हटले होते, कितीही धावा केल्या तरी सामना जिंकायला वीस बळी घ्यावे लागतात. आपल्या गोलंदाजांची कामगिरी बघता त्यांनी वीस बळी घेणे हे दुरापास्त वाटते. इंग्लंडचा पहिलाच डाव अजून आपल्याला आटोपला नाही, तेव्हा इंग्लंडची या पुढची प्रत्येक धाव आपल्या आशा अजूनच मावळणारी ठरणार आहे.