

लीडस् : जसप्रीतचा भेदक मारा आणि के.एल. राहुलच्या संयमी 47 धावांच्या खेळीमुळे भारताने येथील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर नियंत्रण ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. रविवारी तिसर्या दिवसअखेरीस 2 बाद 90 धावांसह भारतीय संघ या लढतीत 96 धावांनी आघाडीवर राहिला असून आता सोमवारी चौथ्या दिवसाच्या खेळात ही आघाडी मजल-दरमजल प्रवासात आणखी भक्कम करण्यात भारत यशस्वी ठरणार की इंग्लंडचा संघ भारताच्या बचावाला भगदाड पाडण्यात यशस्वी ठरणार, याची आज उत्सुकता असेल. एकंदरीत हेडिंग्लेचा हा रणसंग्राम आता निर्णायक वळणावर पोहोचतो आहे!
हेडिंग्ले येथे सुरू असलेल्या या चुरशीच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याच्या तिसर्या दिवशी जसप्रीत बुमराहच्या भेदक मार्यानंतर के. एल. राहुलच्या संयमी 47 धावांच्या नाबाद खेळीमुळे भारताने इंग्लंडवर नियंत्रण ठेवले. इंग्लंडचा पहिला डाव 465 धावांवर आटोपताच भारताला सहा धावांची आघाडी मिळाली होती. दिवसाचा खेळ पावसामुळे अर्धा तास आधी थांबवण्यात आला, तेव्हा भारताने दुसर्या डावात 2 बाद 90 धावा केल्या होत्या आणि 96 धावांची आघाडी घेतली होती.
भारताकडून जसप्रीत बुमराहने 83 धावांत 5 बळी घेतले. ही त्याची कसोटीतील 14 वी पाच बळींची कामगिरी असून परदेशातली 12 वी ‘फायव्हर’ आहे. त्याने या प्रकारात कपिल देवच्या विक्रमाची बरोबरी केली. प्रसिद्ध कृष्णाने तीन तर मोहम्मद सिराजने दोन गडी बाद केले. भारताच्या दुसर्या डावात यशस्वी जैस्वाल अवघ्या 4 धावांवर बाद झाला. त्याला बायडन कार्सने बाद केले. त्यानंतर के. एल. राहुल आणि साई सुदर्शन यांनी दुसर्या विकेटसाठी 66 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत डाव सावरला. साई सुदर्शनला पुन्हा एकदा स्टोक्सने तंबूत पाठवले. दिवसअखेर राहुल 47 धावांवर नाबाद असून, शुभमन गिल 6 धावांवर त्याच्या साथीला आहे.
हेडिंग्ले कसोटी सामन्यादरम्यान, भारतीय यष्टिरक्षक ऋषभ पंत यष्टींमागे आपल्या नेहमीच्या शैलीत दिसला. स्टम्प माईकमध्ये गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांसोबतच्या त्याच्या अनेक टिपणी आणि संवाद नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाले. एका व्हिडीओमध्ये, पंत रवींद्र जडेजाच्या वाईड चेंडूवर प्रतिक्रिया देताना दिसून आला. इंग्लंडचा आक्रमक सलामीवीर बेन डकेट मोठे फटके खेळेल या अपेक्षेने, डावखुरा फिरकी गोलंदाज जडेजाने चेंडू लेग-साईडच्या बराच बाहेर टाकला. हा चेंडू पकडण्यासाठी पंतला आपल्या उजवीकडे झेप घ्यावी लागली. यावेळी पंत जडेजाला म्हणाला, ‘मैं भी खेल रहा हूं भाई, अपने चौके के चक्कर में मेरा चौका मत दे देना!
02 : हॅरी ब्रूकने हेडिंग्लेच्या आपल्या घरच्या मैदानावर कसोटी कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक झळकावले. आजवर त्याने या मैदानात केवळ तीनच कसोटी डाव खेळले आहेत, हे येथे लक्षवेधी आहे.
36 : ख्रिस वोक्स व ब्रायडन कार्स यांनी आठव्या गड्यासाठी अवघ्या 36 चेंडूंतच अर्धशतक साजरे केले, ते लक्षवेधी ठरले.
99 : हॅरी ब्रुकने आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत कसोटी क्रिकेटमध्ये 99 धावांवर बाद होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. जेमी स्मिथप्रमाणेच तो देखील आखूड टप्प्याचा चेंडू हूक करण्याच्या मोहात बाद झाला.
भारत-इंग्लंड कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहने एका नोबॉलचा अपवाद वगळता दमदार गोलंदाजी केली; परंतु भारतीय क्षेत्ररक्षकांच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे मिळालेल्या संधी वाया गेल्या.
6.6 बुमराहच्या गोलंदाजीवर डकेटला जडेजाकडून बॅकवर्ड पॉईंटवर जीवदान. डाईव्ह मारत दोन्ही हातांनी झेल टिपण्याचा प्रयत्न चुकला. झेल चुकताच चेंडू आदळून निराशा व्यक्त!
30.6, पोपला जैस्वालकडून जीवदान मिळाले. पोप यावेळी कॉर्डनच्या बाहेर फटका मारण्याच्या प्रयत्नात चकला होता. मात्र, जैस्वालने नामी संधी गमावली, झेल सोडला!
48.4 बुमराहचा नोबॉल ब्रुकसाठी संधी! या षटकात बुमराहने चक्क तीन नोबॉल टाकले. सिराजने मिडविकेटवर मागे धावत शानदार झेल घेतला. पण, पंचांचा नोबॉलचा निर्देश!
71.1 पंतकडून ब्रुकला जीवदान! ब्रुक पुन्हा सुदैवी! जडेजाच्या गोलंदाजीवर चेंडूने बॅटची कड घेतलेली. पण, पंतचा अंदाज चुकला.
84.6 बुमराहच्या गोलंदाजीवर ब्रुकचा सोपा झेल जैस्वालने सोडला आणि भारताला आणखी एक धक्का बसला. अतिशय सोपा झेल असतानाही चौथ्या स्लीपमध्ये जैस्वालकडून अपेक्षाभंग!