पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि बांगलादेश ( ind vs ban) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना गुरुवार (दि.१९ सप्टेंबर)पासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. ICC कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अग्रस्थानी राहण्यासाठी भारतासाठी ही मालिका महत्त्वपूर्ण आहे. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट आहे. जाणून घेवूया चेन्नईतील सामना काळातील हवामानाविषयी...
भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेत दोन सामने होणार आहेत. बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज आहे. नवीन प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आपली रणनीती आखली असून, खेळाडूंनीही सरावात मेहनत घेतली आहे. गुरुवारपासून सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यावर सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील चेन्नई कसोटी दरम्यानच्या हवामानाबाबत accuweather.com ने दिलेल्या माहितुसार 19 आणि 20 सप्टेंबर रोजी पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसामुळे सामन्यादरम्यान व्यत्यय येऊ शकतो. सामन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे 19 सप्टेंबरला पहिला एक ते दीड तास पाऊस पडेल, असा अंदाज आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 सप्टेंबरलाही त्याच प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सर्व संघ भारताला हरवण्याचा आनंद घेतात, त्यांना आनंद घेऊ द्या. इंग्लंडमध्ये आल्यावर त्यांनी प्रेसमध्येही खूप काही सांगितले, पण आपण त्याकडे लक्ष देत नाही. आम्ही चांगले क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतो. बांगलादेशी संघाला मजा करू द्या, त्यांची काळजी घेतली जाईल, अशा शब्दांमध्ये रोहित शर्माने बांगलादेश संघाला इशारा दिला आहे. कसोटी सामन्यानिमित्त चेन्नई येथे आयोजित पत्रकार परिषदेत तो बोलत होता.
बांगलादेशने नुकतीच पाकिस्तानमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका जिंकली आहे. त्यामुळे संघाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. राओपिंडी येथे खेळल्या गेलेल्या दोन्ही कसोटीत बांगलादेशने पाकिस्तानचा पराभव केला होता. त्याने पहिली कसोटी 10 गडी राखून आणि दुसरी कसोटी 6 गडी राखून जिंकली होती.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज , आकाशदीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.
बांगलादेश संघ : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन कुमार दास, मेहिदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहीद राणा, हसन महमूद, नहीद राणा. तस्किन अहमद, सय्यद खालिद अहमद, झकर अली अनिक.