पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तान विरुद्ध कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतालाही पराभूत करण्याची वल्गना करणार्या बांगलादेश संघाला टीम इंडियाने पहिल्या कसोटी सामन्यात चांगला दणका दिला. चेन्नई कसोटीतील विजयाचा शिल्पकार ठरला तो रविचंद्रन अश्विन. याने पहिल्या डावात आपल्या कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक (113) झळकावले आणि त्यानंतर दुसऱ्या डावात सहा विकेट्स घेतल्या. यामुळे बांगलादेश विरुद्ध टीम इंडियाने दिमाखदार 280 धावांनी विजय मिळवला. कसोटी कारकिर्दीतील ३७ व्यांदा पाच बळी घेणार अश्विने या विक्रमाबाबत दिवंगत फिरकीपटू शेन वॉर्नची बरोबरी केली. भारताला बांगलादेशविरुद्ध दुसरी कसोटी कानपूरमध्ये खेळायची आहे. अश्विन कानपूर कसोटीत सात विक्रम करू शकतो. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून सुरू होत आहे. चला रविचंद्रन अश्विन कोणते विक्रम मोडेल ते जाणून घेवूया...
अश्विन हा याआधीच कसोटीच्या चौथ्या डावात सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज आहे. एक विकेट घेऊन तो कसोटीच्या चौथ्या डावात 100 बळी पूर्ण करेल आणि हा टप्पा गाठणारा तो पहिला भारतीय ठरेल. एकूणच अशी कामगिरी करणारा तो सहावा गोलंदाज ठरेल. चेन्नईमध्ये अश्विनने या बाबतीत महान अनिल कुंबळेला मागे टाकले होते. कुंबळेने चौथ्या डावात 94 विकेट घेतल्या, तर अश्विनच्या नावावर 99 विकेट्स आहेत. बिशनसिंग बेदी 60 विकेट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे.
अश्विनने चेन्नईत सातव्यांदा कसोटीच्या चौथ्या डावात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत. या बाबतीत त्याने शेन वॉर्न आणि मुथय्या मुरलीधरनची बरोबरी केली. अश्विनला कानपूरमध्ये वॉर्न आणि मुरलीधरनला मागे टाकण्याची संधी असेल. सध्या त्याच्या पुढे फक्त श्रीलंकेचा माजी फिरकीपटू रंगना हेराथ आहे. हेराथने कसोटीच्या चौथ्या डावात 12 वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनण्याची अश्विनला संधी आहे. या यादीत झहीर खान पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 31 विकेट घेतल्या होत्या. भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होण्यासाठी अश्विनला आणखी तीन विकेट्सची गरज आहे. या यादीत अश्विन २९ विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे.
2023-25 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनण्याचीही अश्विनला संधी आहे. त्याने आतापर्यंत 48 विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लायनला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात आघाडीवर विकेट घेणारा गोलंदाज म्हणून मागे टाकण्यासाठी अश्विनला आणखी आठ विकेट्सची गरज आहे. २०१९ मध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिप सुरू झाली आणि तेव्हापासून लियॉनने १८७ विकेट घेतल्या आहेत, तर अश्विन 180 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अश्विन लियॉनला मागे सोडू शकतो
अश्विनने आतापर्यंत कसोटीत 37 वेळा एका सामन्यातील एका डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत. या बाबतीत तो शेन वॉर्नच्या बरोबरीने आहे. कानपूर कसोटीत आणखी एका डावात पाच विकेट घेताच तो शेन वॉर्नला मागे टाकेल. त्यानंतर केवळ मुथय्या मुरलीधरन त्याच्या पुढे असेल, त्याने कसोटीत 67 पाचवेळा पाच बळी घेतले.
अश्विनने (५२२) कानपूर कसोटीत आठ विकेट घेतल्यास तो लियॉनला (५३०) मागे टाकून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सातवा ठरेल. या यादीत मुरलीधरन, वॉर्न, अँडरसन, कुंबळे, ब्रॉड आणि मॅकग्रा हे त्याच्यापेक्षा वरचढ राहतील.
खेळाडू सामने विकेट
मुथय्या मुरलीधरन १३३ ८००
शेन वॉर्न १४५ ७०८
जेम्स अँडरसन १८८ ७०४
अनिल कुंबळे १३२ ६१९
स्टुअर्ट ब्रॉड १६७ ६०४
ग्लेन मॅकग्राथ १२४ ५६३
नॅथन लियॉन 129 530
आर अश्विन 101 522
कोर्टनी वॉल्श 132 519