
सततच्या पावसामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ थांबला आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी केवळ 13.2 षटकेच खेळता आली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात बिनबाद 28 धावा केल्या आहेत. उस्मान ख्वाजा नाबाद 19 धावा आणि नॅथन मॅकस्विनी चार धावांवर नाबाद आहेत. गाबा कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसामुळे खेळात वारंवार व्यत्यय आला. प्रथमच 5.3 षटकांनंतर पावसामुळे 20-25 मिनिटांचा खेळ वाया गेला. त्यानंतर 13.2 षटकांनंतर पुन्हा एकदा खेळ थांबवावा लागला.
सुरुवातीच्या दिवशी पहिल्या सत्रात अजूनही काही खेळ शक्य होता, पण उपाहाराच्या विश्रांतीपूर्वी पुन्हा पाऊस सुरू झाला आणि सामना थांबवावा लागला. दुसऱ्या सत्राचा खेळ पूर्णपणे वाहून गेला, मात्र त्यानंतरही परिस्थिती बदलली नाही आणि पंचांनी यष्टिचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे आता दुसऱ्या दिवशी 98 षटके टाकली जातील आणि सामना नियोजित वेळेच्या अर्धा तास आधी सुरू होईल. म्हणजेच दुसऱ्या दिवसाचा सामना भारतीय वेळेनुसार पहाटे 5:20 वाजता सुरू होईल.