

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 5 सामन्यांचा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना पर्थमध्ये खेळवला जात आहे. रविवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. भारताने कांगारूंसमोर 534 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. यजमान संघाची दुसऱ्या डावात अवस्था बिकट झाली आहे. त्यांनी 4.5 षटके खेळून 12 धावांत 3 विकेट गमावल्या आहेत. कर्णधार जसप्रीत गुमराहने दोन आणि मोहम्मद सिराजने एक बळी मिळवला. नॅथन मॅकस्विनी (0), पॅट कमिन्स (2) आणि मार्नस लॅबुशेन (3) पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. उस्मान ख्वाजा नाबाद 3 धावा करून क्रिजवर आहे.
तत्पूर्वी, विराट कोहलीच्या शतकानंतर भारताने आपला दुसरा डाव 487 धावांवर घोषित केला. कोहलीशिवाय भारताकडून यशस्वी जैस्वालने शतक झळकावले. त्याने 161 धावांची शानदार खेळी केली. तर केएल राहुलने 77 धावांचे योगदान दिले.
आजपर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 500 किंवा त्याहून अधिक धावांचे लक्ष्य गाठण्यात कोणत्याच संघाला यश आलेले नाही. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च लक्ष्याचा पाठलाग 418 धावांचा आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पर्थ कसोटी जिंकल्यास इतिहास रचला जाईल.
भारताने पहिल्या डावात 150 धावा केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ अवघ्या 104 धावांवर गारद झाला. पहिल्या डावानंतर भारताकडे 46 धावांची आघाडी होती.
पर्थ कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय संघाकडून उत्कृष्ट फलंदाजी दिसून आली ज्यामध्ये पहिल्या विकेटसाठी 201 धावांची ऐतिहासिक भागीदारी पाहायला मिळाली. केएल राहुलने 77 धावांची खेळी खेळली. त्यानंतर यशस्वी जैस्वालने कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले. त्याने 161 धावांची उत्कृष्ट खेळी केली. यानंतर विराट कोहलीलाही बऱ्याच कालावधीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावण्यात यश आले. त्याने 143 चेंडूत 100 धावांची खेळी केली. या जोरावर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला 534 धावांचे लक्ष्य देण्यात यशस्वी ठरली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियन मैदानावर 500 हून अधिक धावांची आघाडी मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
इंग्लंड : 741 धावा (ब्रिस्बेन कसोटी, 1928)
दक्षिण आफ्रिका : 631 धावा (पर्थ-वाका स्टेडियम, 2012)
वेस्ट इंडिज : 573 धावा (ॲडलेड स्टेडियम, 1980)
दक्षिण आफ्रिका : 538 धावा (पर्थ-वाका स्टेडियम, 2016)
भारत : 533 धावा (पर्थ-ऑप्टस स्टेडियम, 2024)