

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिडनी येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी राखून पराभव केला आहे. भारतीय संघाने कांगारूंसमोर 162 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने चार गडी गमावून लक्ष्य गाठले. या पराभवासह भारताने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकाही गमावली आहे. ऑस्ट्रेलियाने ही मालिका 3-1 ने जिंकली. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर कांगारुनी 10 वर्षानंतर आपले नाव कोरले आहे. यासोबतच टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीतूनही बाहेर आहे. ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरी गाठली असून दक्षिण आफ्रिकेने आधीच पात्रता मिळवली आहे. जूनमध्ये लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात डब्ल्यूटीसीचा विजेतेपदाचा सामना खेळवला जाईल.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 181 धावांवर संपला. टीम इंडियाकडे दुसऱ्या डावात चार धावांची आघाडी होती. भारताचा दुसरा डाव 157 धावांत आटोपला आणि एकूण आघाडी 161 धावांची झाली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने सॅम कॉन्स्टास (22), उस्मान ख्वाजा (41), मार्नस लॅबुशेन (6) आणि स्टीव्ह स्मिथ (4) यांचे विकेट गमावले. यानंतर ट्रॅव्हिस हेड (34*) आणि ब्यू वेबस्टर (39*) यांनी ४६ धावांची नाबाद भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. भारत दुसऱ्या डावात कर्णधार जसप्रीत बुमराहशिवाय होता. बुमराहला पाठीच्या जडपणाचा त्रास होत आहे. त्याच्या जागी विराट कोहली कर्णधार झाला. भारताकडून प्रसिध कृष्णाने तीन, तर सिराजला एक विकेट मिळाली.