

लंडन; वृत्तसंस्था : पोलंडच्या इगा स्वायटेकने शनिवारी अमांडा अॅनिसिमोव्हाचा केवळ 57 मिनिटांत 6-0, 6-0 असा धुव्वा उडवत आपले पहिलेवहिले विम्बल्डन विजेतेपद पटकावले. गेल्या 114 वर्षांच्या विम्बल्डनच्या इतिहासात महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात एखाद्या खेळाडूला एकही गेम जिंकता न आल्याची ही पहिलीच वेळ ठरली.
शनिवारी अमांडा अॅनिसिमोव्हावर 6-0, 6-0 असा एकतर्फी विजय मिळवत स्वायटेकने आपले पहिले विम्बल्डन आणि एकूण सहावे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले. या विजयासह, ग्रास कोर्टवर खेळण्याची आपली क्षमता तिने निर्विवादपणे सिद्ध केली आहे. पोलंडच्या या आठव्या मानांकित खेळाडूने आतापर्यंत खेळलेले सर्व सहा प्रमुख अंतिम सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे. तिने पहिल्या गुणापासूनच सामन्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आणि अवघ्या 57 मिनिटांत विजय साकारला. 2016 मध्ये सेरेना विल्यम्सने ऑल इंग्लंड क्लबमध्ये आपले सातवे आणि अखेरचे विजेतेपद जिंकल्यानंतर, 24 वर्षीय स्वायटेक ही विम्बल्डनची सलग आठवी नवीन महिला विजेती ठरली आहे.
दोन आठवड्यांपूर्वी बॅड हॉम्बर्ग येथील ग्रास-कोर्ट स्पर्धेची अंतिम फेरी गाठणार्या स्वायटेकचा खेळ या स्पर्धेत उत्तरोत्तर बहरत गेला, तर दुसरीकडे ऑल इंग्लंड क्लबमध्ये अव्वल मानांकित खेळाडू एकामागोमाग एक पराभूत होत होते. अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासात तिने केवळ एकच सेट गमावला होता.