

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाने हुलकावणी दिल्यानंतर, बॉक्सिंगमधून निवृत्ती घेण्याचा विचार तात्पुरता बाजूला सारून आसामच्या स्टार बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनने आता आपले लक्ष दुसर्या ऑलिम्पिक पदकावर केंद्रित केले आहे. आगामी जागतिक चॅम्पियनशिपमधून ती आंतरराष्ट्रीय रिंगमध्ये पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे. तिचे पुनरागमन 4 सप्टेंबर रोजी लिव्हरपूल येथे होणार्या जागतिक चॅम्पियनशिपमधून होईल. मात्र, तयारीसाठी मर्यादित वेळ मिळाल्याने हा मार्ग खडतर असल्याचे तिने मान्य केले.
टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती लोव्हलिना गेल्या ऑगस्टमध्ये झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकपासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांपासून दूर होती. या काळात तिने आपल्या अकादमीच्या उभारणीवर लक्ष केंद्रित केले होते. एका वृत्तसंस्थेशी बोलताना लोव्हलिना म्हणाली, जेव्हा मी अकादमी सुरू करण्याचा विचार केला, तेव्हा पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत खेळून निवृत्त होण्याची माझी योजना होती; पण पॅरिसमधील निकाल माझ्या अपेक्षेप्रमाणे लागला नाही.
फ्रान्सच्या राजधानीत, 27 वर्षीय लोव्हलिनाला सलग दुसर्या ऑलिम्पिक पदकाच्या उंबरठ्यावरून परतावे लागले. महिलांच्या 75 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत तिला चीनच्या ली कियानकडून पराभव पत्करावा लागला, जी पुढे सुवर्णपदक विजेती ठरली. 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यास तो तिचा अखेरचा सामना असेल का, असे विचारले असता, लोव्हलिनाने स्पष्टपणे सांगितले, होय, ते शक्य आहे.
पॅरिसमधील पराभवाची खंत असली, तरी तिचा आत्मविश्वास कायम आहे. ती म्हणाली, मी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकू शकले असते. कारण, पोडियमवर उभ्या राहिलेल्या सर्व महिला खेळाडूंना मी यापूर्वी हरवले आहे. मी चॅम्पियनला हरवले आहे, रौप्यपदक विजेती माझ्याकडून दोनदा पराभूत झाली आहे आणि दोन्ही कांस्यपदक विजेत्यांनाही मी मात दिली आहे. यावरून माझी पातळी दिसून येते आणि मला माहीत आहे की, मी आणखी एक ऑलिम्पिक पदक जिंकू शकते. हीच गोष्ट मला पुढे जात राहण्यासाठी, प्रयत्न करत राहण्यासाठी प्रेरणा देते.