

मुंबई; वृत्तसंस्था : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) महिला विश्वचषक 2025 स्पर्धेचे बिगुल अखेर वाजले आहे. स्पर्धेला 50 दिवस शिल्लक असताना, भारताची माजी कर्णधार मिताली राज आणि 2011 विश्वविजेता संघसहकारी युवराज सिंग यांच्या मुख्य उपस्थितीत मुंबईत ट्रॉफी टूरचा शानदार शुभारंभ करण्यात आला.
‘आयसीसी’ महिला विश्वचषकाची 13 वी आवृत्ती भारत आणि श्रीलंकेत संयुक्तपणे आयोजित केली जाणार आहे. 30 सप्टेंबर रोजी यजमान भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने स्पर्धेला सुरुवात होईल. सोमवारी झालेल्या या कार्यक्रमाला भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स यांच्यासह ‘आयसीसी’चे अध्यक्ष जय शहा, मुख्य कार्यकारी अधिकारी संजोग गुप्ता आणि ‘बीसीसीआय’चे सचिव देवजित सैकिया उपस्थित होते.
यावेळी बोलताना जय शहा यांनी भारतात होणार्या या स्पर्धेबद्दल प्रचंड उत्साह व्यक्त केला. ते म्हणाले, महिला क्रिकेटसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. ही स्पर्धा खेळाला जागतिक स्तरावर एक नवी उंची देईल. स्पर्धेच्या तयारीला वेग आला असून, आम्ही सर्व सहभागी संघांना आणि चाहत्यांना एक जागतिक दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत.
‘आयसीसी’ महिला वर्ल्डकप आयोजनामुळे भारतात महिला क्रिकेटची व्याप्ती अधिक वाढेल, असे ‘आयसीसी’चे अध्यक्ष जय शहा यावेळी म्हणाले. भारताने यापूर्वीही वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन केले आहे. मात्र, 2025 वर्ल्डकप स्पर्धेसाठी सर्वोत्तम पायाभूत सुविधा देत असल्याने खेळाचा जागतिक दर्जा आणखी उंचावेल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. पॅनेल चर्चेत सहभागी आजी-माजी खेळाडूंच्या सूचनांचे स्वागत करतानाच, नव-नव्या कल्पना आणि सूचनांचे ‘आयसीसी’ स्वागत करते. आजच्या पॅनेल चर्चेसारख्या चर्चा आमच्या सामूहिक द़ृष्टिकोनाला आकार देण्यासाठी आणि प्रगतीला चालना देण्यासाठी अमूल्य आहेत. स्पर्धा सुरू होण्यास 50 दिवस शिल्लक असताना सर्व सहभागी संघांची चांगली तयारी सुरू आहे. नव्या आव्हानासाठी सज्ज होणार्या सर्व सहभागी संघांना मी शुभेच्छा देतो. मला विश्वास आहे की, त्यांना भारत आणि श्रीलंकेत एक अविस्मरणीय अनुभव मिळेल, असे जय शहा पुढे म्हणाले.
भारत 1978, 1997 आणि 2013 नंतर चौथ्यांदा महिला विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. ‘पीसीबी’ आणि ‘बीसीसीआय’ यांच्यातील करारानुसार, पाकिस्तानचे सर्व सामने आणि इतर पाच सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. दरम्यान, जून महिन्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमुळे बंगळूरमधील सामन्यांच्या आयोजनाबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे.