पुढारी ऑनलाईन डेस्क : महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत आज (दि.६) भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने आले. आहेत. पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी नांगी टाकली. २० षटकात ८ विकेट गमावत १०५ धावांपर्यंत मजल मारली. भारताने हे आव्हान 19व्या षटकात पूर्ण करत टी-20 विश्वचषक स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. ( IND vs PAK T20WC )
आजच्या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाकडून निदा दारने सर्वाधिक २८ धावा केल्या. त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला २० धावांची वैयक्तिक धावसंख्या गाठता आली नाही. या डावात पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या घरासारखी कोसळली. भारताच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत एकाही फलंदाजाला जम बसू दिला नाही. मुनिबाने १७, गुल फिरोजाने शून्य, सिद्रा अमीनने आठ, ओमामा सोहेलने तीन, आलिया रियाझने चार, फातिमा सनाने 13, तुबा हसनने शून्य, सईदा आणि नशरा या अनुक्रमे १४ आणि ६ धावांवर नाबाद राहिल्या. भारताकडून अरुंधती रेड्डीने तीन आणि श्रेयंका पाटीलने दोन तर रेणुका, दीप्ती आणि आशा यांना प्रत्येकी एक विकेट घेतली.
भारताने आपल्या डावाची सुरुवात सावध केली. आजच्या सामन्यातही स्मृती मानधना विशेष खेळी करु शकली नाही. केवळ सात धावांवर ती आउट झाली. दहा षटकानंतर भारताने १ विकेट गमावत ५० धावा केल्या आहेत. शफाली वर्मा २४ धावांवर तर जेमिमाह रॉड्रिग्ज १३ धावांवर खेळत हाेत्या. मात्र १२ षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ओमामा सोहेलने शेफाली वर्माला आलिया रियाझकरवी झेलबाद केले. शफाली वर्माने ३५ चेंडूत ४ चौकार फटकावत ३२ धावा केल्या. यानंतर शेफाली वर्मा आऊट झाल्यानंतर जेमिमाह रॉड्रिग्ज आणि हरमनप्रीत कौरने धाव फलक हालता ठेवत भारताला विजयासमीप नेले.
८० धावांवर भारताला सलग दाेन धक्के बसले. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर एकाबाजूने धाव फलक हालता ठेवला. तिला दिप्तीची साथ लाभली. मात्र १९ व्या षटकात जखमी झालेल्या हरमनप्रीतला मैदान साेडावे लागले. तिने २४ चेंडूत १ चाैकार फटकावत निर्णायक २९ धावांची खेळी केली. अखेर संजना संजीवने १९ षटकामध्ये १०६ धावांचे लक्ष्य पूर्ण केले. भारताने ६ गडी राखून यंदाच्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत पहिला विजय नोंदवला.