WT-20WC : पुन्हा शेफाली खेळली, भारत जिंकला
मेलबर्न : पुढारी ऑनलाईन
भारताने आपल्या अ गटातील अखेरच्या सामन्यात श्रीलंकेचा 7 विकेट राखून पराभव केला. या विजयाबरोबरच भारताने आपले गुणतालिकेत 8 गुणांसह अव्वल स्थान अबाधित राखले. भारताकडून पुन्हा एकदा धडाकेबाज सलामीवीर शेफाली वर्माने दमदार कामगिरी करत 47 धावांची खेळी केली. त्यामुळे श्रीलंकेने ठेवलेले 114 धावांचे आव्हान भारताने 3 गड्यांच्या मोबदल्यात 15 व्या षटकातच पार केले. गोलंदाजीत राधा यादवने 4 विकेट घेत श्रीलंकेला 20 षटकात 113 धावात रोखले.
श्रीलंकेचे 114 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने बाकीच्या सामन्यांप्रमाणे याही सामन्यात आक्रमक सुरुवात केली. शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी 4 षटकात 34 धावांची सलामी दिली. पण, स्मृतीला पुन्हा एकदा चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात अपयश आले. ती 17 धावा करुन बाद झाली. स्मृतीनंतर कर्णधार हरमनप्रीत कौर स्वतः तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास आली. दरम्यान, स्फोटक सलामीवीर शेफालीने आपल्या आक्रमक शैलीत फलंदाजी करत भारताचे अर्धशतक 6 षटकातच धावफलकावर लावले.
दरम्यान, हरमनप्रीत कौरनेही आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. पण, तिलाही मोठी खेळी करण्यात अपयश आले. ती 15 धावा करुन बाद झाली. पण, शेफालीबरोबर तिने दुसऱ्या विकेटसाठी 47 धावांची आक्रमक भागिदारी रचली. कौर नंतर शेफालीने झपाट्याने धावा करुन सामना श्रीलंकेपासून दूर नेण्यास सुरुवात केली. याचबरोबर ती आपल्या अर्धशतकाच्या जवळही पोहचत होती. पण, 34 चेंडूत 7 चौकार 1 षटकार मारुन 47 धावा केल्यानंतर ती धावबाद झाली.
शेफाली बाद झाली त्यावेळी भारताच्या 11 षटकात 3 बाद 88 धावा झाल्या होत्या. भारताला विजयासाठी 9 षटकात 26 धावांची गरज होती. शेफाली बाद झाल्यानंतर आलेल्या जेमिमा रॉड्रिग्ज आणि दिप्ती शर्मा यांनी भारताच्या विजयाची औपचारिक्ता पूर्ण केली. या दोघींनीही प्रत्येकी नाबाद 15 धावा केल्या. भारताने आपल्या अ गटातील अखेरचा सामना 7 विकेट राखून जिंकत गुणतालिकेत 8 गुणांसह अव्वल स्थान अबाधित राखले. भारत आधीच उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. आता त्याचे अ गटातील पहिले स्थान पक्के झाल्याने उपांत्य फेरीत ब गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाबरोबर सामना होणार आहे. हा सामना 5 मार्च रोजी सिडनी येथे होणार आहे.
तत्पूर्वी, श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, दिप्ती शर्माने लंकेला पहिला धक्का दिल्याने त्यांची सुरुवात खराब झाली. शर्माने सलामीवील उमेशा थिमाशिनीला 2 धावांवर बाद केले. श्रीलंकेचा दुसरी सलामीवीर आणि कर्णधार चमारी आटापटू आणि हर्षिता माधवी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी 30 धावांची भागिदारी रचली.
पण, राजेश्वरी गायकवाडने हर्षिताचा (12) त्रिफळा उडवत ही जोडी फोडली. त्यानंतर लंकेच्या डावाची घसरण सुरु झाली. राधा यादवने चामीरी आटापटूला 33 धावावर बाद केले, पाठोपाठ हसिनी परेराचाही अडसर दूर केला. त्यमुळे लंकेची अवस्था 11 षटकात 4 बाद 58 अशी झाली. पण, त्यानंतर आलेल्या शशिकला श्रीवर्धनेने आक्रमक पवित्रा धारण केला. पण, राधा यादवने हंसिना करुणारत्नेला बाद करत लंकेला पाचवा धक्का दिला. त्यानंतर राजेश्वरी गायकवाडने शशिकलाचा झंजावात 13 धावातच शांत केला. पाठोपाठ राधा यादवने अनुष्का संजिवनीला 1 धावेवर बाद करत आपला चौथा मोहरा टिपला. त्यामुळे लंकेची 15 षटकात 7 बाद 80 धावा अशी बिकट अवस्था झाली.
पण, त्यानंतर कविशी दिलहारीने चिवट फलंदाजी करत श्रीलंकेला शंभरी पार करुन दिली. पण, दुसऱ्या बाजूने तिला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. अखेर श्रीलंकेला 20 षटकात 9 बाद 113 धावांपर्यंतच मजल मारता आली. कविशी दिलहारीने नाबाद 25 धावा केल्या. भारताकडून राधा यादवने 4 तर राजेश्वरी गायकवाडने 2 विकेट घेतल्या. याचबरोबर दिप्ती शर्मा, शिखा पांडे आणि पूनम यादवने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
