

दुबई; वृत्तसंस्था : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत हस्तांदोलन वाद प्रकरणानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) केलेल्या कृतीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः मॅच रेफरी अँडी पायक्र ॉफ्ट यांच्यासोबत झालेल्या बैठकीचे मोबाईलवर चित्रीकरण करणे हे पीएमओ (प्लेअर्स अँड मॅच ऑफिशियल्स एरिया) प्रोटोकॉलचे उल्लंघन आणि गैरकृती असल्याचे स्पष्ट करत आयसीसीने पीसीबीला चांगलेच फटकारले आहे.
आयसीसीचे सीईओ संजोग गुप्ता यांनी पीसीबीला एक ई-मेलद्वारे पाठविला असून त्यामध्ये कठोर शब्दांत कानउघाडणी केली आहे. पीएमओमध्ये मोबाईल वापरण्यास मनाई असूनही मीडिया मॅनेजर नईम गिलानी यांनी बैठक रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. अँटिकरप्शन कोडनुसार यावर बंदी आहे. पीसीबीने मात्र ठाम राहून, व्हिडीओ न घेतल्यास संघ सामना खेळणार नाही, अशी अट घालण्यास सुरुवात केली. शेवटी तडजोड म्हणून आवाजाशिवाय व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याची परवानगी देण्यात आली.
या बैठकीला कर्णधार सलमान आगा, प्रशिक्षक माईक हेसन, व्यवस्थापक नवीद अक्रम चिमा तसेच आयसीसीचे क्रिकेट जनरल मॅनेजर वसीम खान उपस्थित होते. बैठकीत पायक्रॉफ्ट यांनी पाकिस्तान व्यवस्थापनाला सांगितले की, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव हा पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा सोबत हस्तांदोलन करणार नाही, ही सूचना केवळ त्यांना एका अधिकार्याकडून मिळाली होती. पायक्र ॉफ्ट यांनी या बैठकीत गैरसमज आणि संभाषणातील त्रुटींमुळे खेद व्यक्त केला, असे स्पष्ट केले; पण त्यानंतर लगेचच पीसीबीने एक निवेदन जारी करून पायक्रॉफ्ट यांनी पाकिस्तान संघाच्या व्यवस्थापक आणि कर्णधाराची माफी मागितली आहे, असा दावा केला होता. त्यानंतर आयसीसीने पीसीबीने केलेला दावा फेटाळला. गुप्ता यांनी पुन्हा स्पष्ट केले की पायक्रॉफ्ट यांनी फक्त गैरसमजाबद्दल खेद व्यक्त केला होता, माफी मागितली नव्हती.
पीसीबीचा आरोप होता की, पायक्रॉफ्ट यांनीच सलमान आगा याला भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्याशी हस्तांदोलन न करण्याचा आदेश दिला होता. मात्र, आयसीसीच्या चौकशीनंतर स्पष्ट झाले की पायक्रॉफ्ट फक्त संदेशवाहक होते, आदेश देणारे नव्हते. या संपूर्ण प्रकरणामुळे आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर नियमभंग आणि चुकीच्या माहितीचा प्रसार करणे, असा गंभीर ठपका ठेवला आहे.