One Day World Cup | आयसीसीचा ऐतिहासिक मास्टरस्ट्रोक; वर्ल्डकपच्या स्वरूपात आमूलाग्र बदल

One Day World Cup |
One Day World Cup | आयसीसीचा ऐतिहासिक मास्टरस्ट्रोक; वर्ल्डकपच्या स्वरूपात आमूलाग्र बदल
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्‍था : क्रिकेट जगतातील एकतर्फी आणि नीरस डेड रबर्स सामन्यांना कायमचा पूर्णविराम देण्यासाठी आयसीसीने आगामी २०२७ चा वन डे विश्वचषक आणि २०२८ चा टी-२० विश्वचषकाच्‍या फॉरमॅटमध्‍ये प्रचंड मोठे फेरबदल केले आहेत. या नवीन रचनेमुळे स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून अंतिम सामन्यापर्यंत प्रत्येक संघाला सर्वोत्तम क्षमतेने खेळावे लागणार आहे. याचे कारण म्‍हणजे एका पराभवामुळे थेट स्पर्धेतून बाहेर पडण्याचा कमालीचा धोका असणार आहे.

चाहत्यांसाठी काय बदलणार?

या नव्या नियमांमुळे भारत विरुद्ध पाकिस्तान यांसारखे हायव्होल्टेज सामने अधिक प्रमाणात पाहण्याची संधी चाहत्यांना मिळू शकते, कारण सुपर ७ आणि सुपर १० च्या मोठ्या फेऱ्यांमुळे मोठ्या संघांना एकमेकांविरुद्ध खेळण्याची अधिक संधी मिळेल.

२०२७ वन डे विश्वचषक : ३ टप्प्यांचे ‘चक्रव्यूह’ आणि ‘सुपर ७’चा थरार

दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या २०२७ च्या ५० ओव्हर्सच्या विश्वचषकात १४ संघ कायम ठेवण्यात आले आहेत, मात्र जेतेपदाचा मार्ग आता अधिक खडतर करण्यात आला आहे. आयसीसीने पूर्वी ठरवलेली ‘सुपर ६’ची पद्धत रद्द करून ‘सुपर ७’ चा नवा नियम लागू केला आहे. ही स्पर्धा आता पुढीलप्रमाणे तीन आव्हानात्मक टप्प्यांत खेळवली जाईल.

पहिला टप्पा (सुपर सीरिज) : पात्र ठरलेल्या १४ संघांपैकी रँकिंगमध्ये सर्वात शेवटी असलेल्या खालच्या ३ संघांमध्ये सुरुवातीलाच एक ‘राऊंड रॉबिन’ मालिका होईल. धक्कादायक बाब म्हणजे या ३ पैकी केवळ १ संघ पुढच्या फेरीसाठी पात्र ठरेल, तर उर्वरित २ संघ स्पर्धा सुरू होताच मायदेशी परततील.

दुसरा टप्‍पा (ग्रुप स्टेज - मुख्य फेरी) : सुपर सीरिजमधून आलेल्या एका संघासह एकूण १२ संघ मुख्य फेरीत प्रवेश करतील. त्यांची ६-६ संघांच्या दोन गटांत विभागणी केली जाईल.

तिसरा टप्‍पा (सुपर ७) : दोन्ही गटांतील अव्वल ३-३ संघ (एकूण ६) आणि या सहा संघांशिवाय दोन्ही गटांमध्ये सर्वोत्तम नेट रनरेट किंवा गुण असणारा आणखी १ सर्वोत्कृष्ट संघ, अशा ७ संघांना ‘सुपर ७’मध्ये प्रवेश मिळेल. या ७ संघांमध्ये एकूण २१ सामने होतील आणि यातून अव्वल ४ संघ उपांत्य फेरीत जातील.

२०२८ टी-२० विश्वचषक : ‘सुपर ८’ बाद, आता ‘सुपर १०’चा कडक डोस!

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या २०२८ च्या टी-२० विश्वचषकात एकूण २० संघ भिडतील. मात्र, असोसिएशन (छोटे) देशांना दुसऱ्या फेरीत अधिक वाव देण्यासाठी आयसीसीने ‘सुपर ८’ ऐवजी ‘सुपर १०’चा थरार आणला आहे. यात बाद फेरी थेट ‘आयपीएल’च्या धर्तीवर रंगणार आहे:

नवी गट रचना : सुरुवातीला ४ संघांचे ५ गट पाडले जातील (यापूर्वी ५ संघांचे ४ गट असायचे). प्रत्येक गटातील अव्वल २ संघ ‘सुपर १०’मध्ये पोहोचतील.

‘सुपर १०’ चे समीकरण: इथे ५-५ संघांचे दोन मुख्य गट तयार होतील. दोन्ही गटांतील अव्वल संघ थेट सेमीफायनलचे तिकीट मिळवतील.

असोसिएशन देशांसाठी पात्रतेचे नवे नियम

२०२६ च्या विश्वचषकात नवख्या संघांनी बलाढ्य संघांना दिलेल्या धक्क्यांमुळे आयसीसीने पात्रता फेरीत मोठे बदल केले आहेत

स्कॉटलंडला विशेष सवलत: २०२६ च्या स्पर्धेत अगदी शेवटच्या क्षणी बांगलादेशऐवजी सहभागी व्हावे लागलेल्या स्कॉटलंडला थेट युरोप प्रादेशिक फायनलमध्ये प्रवेश देण्यात आला आहे.

ग्लोबल क्वालिफायर: २०२६ मधील जे संघ थेट पात्र ठरू शकले नाहीत, ते १६ संघांच्या ‘ग्लोबल क्वालिफायर’ फेरीत खेळतील. यातील ८ जागा प्रादेशिक पात्रता फेरीतून (आफ्रिका-२, आशिया-२, युरोप-२, अमेरिका-१ आणि पूर्व आशिया पॅसिफिक-१) भरल्या जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news