

पुढारी ऑनलाईन डेस्क : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दरम्यान पावसामुळे तीन सामने पूर्णपणे रद्द करावे लागले. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश हे सामने पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आले. तर अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना ऑस्ट्रेलियाच्या डावादरम्यान पावसामुळे अर्धवट सोडावा लागला. विशेष म्हणजे, हे तिन्ही सामने पाकिस्तानमध्ये खेळवण्यात आले होते. रविवारी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी (IND VS NZ Match) अंतिम सामन्यात हवामानाची परिस्थिती कशी असणार आहे ते जाणून घेऊया...
दुबईत मात्र परिस्थिती वेगळी आहे. येथे आतापर्यंत कोणत्याही सामन्यावर पावसाचा परिणाम झालेला नाही. विशेषतः भारतीय संघासाठी हे मैदान सुरक्षित राहिले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरू होण्याच्या काही दिवस आधी दुबईत अनपेक्षित पाऊस झाला होता, मात्र हवामान अंदाजानुसार 9 मार्च रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात पावसाची शक्यता फारशी नाही. आतापर्यंत दुबईत चार सामने खेळवले गेले असून एकाही सामन्यावर पावसाचा परिणाम झाला नाही.
स्पर्धेच्या नियमानुसार, नॉकआउट सामन्यांसाठी राखीव दिवस (Reserve Day) निश्चित करण्यात आला आहे. यानुसार, 10 मार्च (सोमवार) हा अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस असेल. जर 9 मार्चला सामना पावसामुळे खेळला गेला नाही, तर तो 10 मार्चला होईल. तसेच, जर सामना सुरु झाल्यानंतर मध्येच थांबवावा लागला, तर तो राखीव दिवशी थांबलेल्या खेळावरुन पुढे सुरू होईल.
उपांत्य फेरीपेक्षा वेगळे नियम अंतिम सामन्यासाठी लागू आहेत. जर राखीव दिवशीही सामना खेळला गेला नाही, तर भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित केले जाईल. उपांत्य फेरीमध्ये मात्र, सामना न खेळल्यास गट-साखळी फेरीत उच्च स्थानावर असलेल्या संघाला फायनलमध्ये प्रवेश देण्यात आला असता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये निकाल निश्चित करण्यासाठी नॉकआउट सामन्यांसाठी एक अतिरिक्त दिवस राखीव ठेवला जातो. जर मुख्य सामन्याच्या दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही किंवा मोठा व्यत्यय आला, तर सामना पुढच्या दिवशी खेळवला जातो. अशाच प्रकारचा राखीव दिवस 2019 च्या वर्ल्ड कप उपांत्यफेरीत भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यासाठी वापरण्यात आला होता, जेव्हा सामना दोन दिवसांत पूर्ण झाला होता.