पुढारी ऑनलाईन डेस्क : मोहम्मद अझरुद्दीन (Mohammed Azharuddin) हे नाव उच्चारलं की एक उत्कृष्ट फलंदाज, चपळ क्षेत्ररक्षक आणि भारतीय क्रिकेट संघाला विजयी होण्याचा ध्यास लावणारा कर्णधार, अशी अनेक विशेषण क्रिकेटप्रेमी उच्चारतात . मात्र त्याचबरोबर 'मॅच फिक्संग' सारख्या भारतीय क्रिकेटमधील काळ्या आठवणाचेही स्मरण होते. आता या सर्वांचे पुन्हा आठवण होण्याचे कारण म्हणजे हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानामधील अझरुद्दीनच्या नावाने असणार्या पॅव्हेलियन स्टँड हटवण्याचे आदेश दिले गेले आहेत.
'क्रिकबझ'च्या वृत्तानुसार, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला उत्तर पॅव्हेलियन स्टँडवरून अझरुद्दीन यांचे नाव हटवण्याचा आदेश मिळाला आहे. याशिवाय, एचसीएला अझरुद्दीन यांच्या नावाने तिकिटे जारी न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शनिवारी (दि.१९) हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे लोकपाल न्यायमूर्ती व्ही. ईश्वरैया यांनी हा आदेश दिला.
लॉर्ड्स क्रिकेट क्लबने दाखल केलेल्या याचिकेमध्ये म्हटलं होतं की, अझरुद्दीनवर वैयक्तिक फायदा मिळविण्यासाठी त्याच्या पदाचा गैरवापर केला आहे. अझरुद्दीन यांनी मैदानावतरील नॉर्थ स्टँडचे नाव बदलून “मोहम्मद अझरुद्दीन स्टँड” असे ठेवले. हा निर्णय हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने किंवा अॅपेक्स कौन्सिलने मंजूर केला नव्हता. याचिकेत अशीही विनंती करण्यात आली होती की, नॉर्थ स्टँडचे नाव 'व्हीव्हीएस लक्ष्मण स्टँड' असे बदलण्यात यावे. सर्व साइनबोर्ड, तिकीट प्रिंटिंग इत्यादी ठिकाणी तेच नाव वापरावे. आता हैदराबाद क्रिकेट असोसिएशन कोणत्याही तिकिटांवर किंवा साइनबोर्डवर 'मोहम्मद अझरुद्दीन स्टँड'चा उल्लेख नसल्याची खात्री करावी लागणार आहे.
न्यायमूर्ती व्ही. ईश्वरैया यांनी आदेशात म्हटले आहे की, अझरुद्दीन यांनी संघटनात्मक नियमांच्या विरुद्ध स्वतःच्या नावावर भूमिका घेतली. तसेच आपल्या अधिकाराचा आणि पदाचा गैरवापर केला आहे. दरम्यान, अझरुद्दीनने हितसंबंधांच्या संघर्षाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच लोकपाल न्यायमूर्तींनी दिलेल्या आदेशाला उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.