

पुणे (वाघोली) : पुण्याच्या वाघोलीतील आखाड्यात आज इतिहास लिहिला गेला. चपळता, ताकद आणि गुरुवर्य काका पवारांच्या तालमीत तयार झालेल्या दोन शिष्यांच्या झुंजीत हर्षवर्धन सदगीरने बाजी मारली. सोलापूरच्या बलाढ्य महेंद्र गायकवाडचा गुणांच्या जोरावर पराभव करत हर्षवर्धनने ६८ व्या महाराष्ट्र केसरी किताबावर आपले नाव कोरले.
विशेष म्हणजे, या विजयासोबतच हर्षवर्धन हा महाराष्ट्राचा सातवा 'डबल महाराष्ट्र केसरी' ठरला असून नाशिक जिल्ह्याला त्याने दुसऱ्यांदा मानाची गदा मिळवून दिली.
अंतिम लढत केवळ दोन पैलवानांमधील नव्हती, तर ती एकाच गुरुच्या दोन शिष्यांच्या कौशल्याची कसोटी होती. आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या या दोघांमध्ये सुरुवातीपासूनच चुरस पाहायला मिळाली. मात्र, पहिल्या डावापासूनच हर्षवर्धनने आपली पकड घट्ट ठेवली. महेंद्रने प्रतिकार करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण हर्षवर्धनची आक्रमक खेळी आणि बचावात्मक चपळता आज वरचढ ठरली.
कुस्तीचा निकाल जाहीर होताच वाघोलीचे मैदान टाळ्यांच्या कडकडाटाने आणि नाशिकच्या घोषणांनी दुमदुमून गेले. आपल्या लाडक्या पैलवानाला सहकाऱ्यांनी खांद्यावर उचलून घेत विजयी मिरवणूक काढली. या ऐतिहासिक विजयाबद्दल हर्षवर्धनला चांदीची गदा, आलिशान फॉर्च्युनर गाडी आणि ५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान करून गौरवण्यात आले.
स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी माती विभागातून महेंद्र गायकवाड आणि गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना धुळ चारत अंतिम फेरीत धडक मारली होती. अंतिम सामन्यात हर्षवर्धनने दाखवलेले खेळाचे प्रदर्शन हे रंजक आणि तितकेच शिस्तबद्ध होते.