गुजरातचा विजयाचा ‘चौकार’!

GT vs RR : राजस्थानला 58 धावांनी नमवले; साई सुदर्शनचा 82 धावांचा झंझावात
GT vs RR
गुजरातचा विजयाचा ‘चौकार’!
Published on
Updated on

अहमदाबाद : साई सुदर्शनची 53 चेंडूंतील 82 धावांची तडाखेबंद खेळी आणि गोलंदाजांच्या भेदक मार्‍याच्या बळावर गुजरात टायटन्सने ‘आयपीएल’ साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध एकतर्फी विजय संपादन केला. सुदर्शनच्या तडाखेबंद खेळीमुळे येथे गुजरातने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 217 धावांपर्यंत मजल मारली, तर प्रत्युत्तरात राजस्थानला 19.2 षटकांत सर्वबाद 159 धावांवर गाशा गुंडाळावा लागला.

विजयासाठी 218 धावांचे आव्हान असताना राजस्थानचा संघ एकदाही विजयाच्या ट्रॅकवर दिसून आला नाही. कर्णधार संजू सॅमसनने 28 चेंडूंत 41 धावा केल्या, तर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या हेटमायरने 32 चेंडूंत 52 धावा झोडपल्या. मात्र, अन्य फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत राहिल्याने याची राजस्थानला पराभवाच्या रूपाने मोठी किंमत मोजावी लागली. गोलंदाजीत प्रसिद्ध कृष्णाने 24 धावांत 3, तर राशीद खान व साई किशोर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

शुभमन स्वस्तात बाद

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर शुभमन गिल तिसर्‍या षटकातील पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याने गुजरातचीदेखील खराब सुरुवात झाली होती. आर्चरने यावेळी शुभमनचा त्रिफळा उडवला. मात्र, साई सुदर्शनने त्याचा धडाकेबाज फॉर्म येथेही कायम ठेवत स्कूप, ड्राईव्ह, कटसारखे भात्यातील एकापेक्षा एक सरस फटक्यांची मालिकाच सुरू केली आणि यामुळे गुजरातचा संघ सावरू शकला. साई सुदर्शनने प्रारंभापासूनच चेंडूवर तुटून पडण्याचा सिलसिला सुरू केला आणि यामुळे गुजरातने 5.1 षटकांतच अर्धशतक फलकावर लावले. पॉवर प्लेची षटके संपली, त्यावेळी साई सुदर्शन 22 चेंडूंत 39 धावांवर खेळत होता.

जोस बटलरचे आर्चरने बाऊन्सरने स्वागत जरूर केले. एक वेळ तर बटलर 12 चेंडूंत 13 धावांवर होता. मात्र, त्यानंतर त्याने धावांचा वेग उंचावत फटकेबाजीवर भर दिला आणि 25 चेंडूंत 36 धावांपर्यंत मजल मारली. महिश तिक्षणाने नंतर 47 चेंडूंतील 80 धावांची ही भागीदारी बटलरला पायचीत करत फोडली. मात्र, एम. शाहरूख खान (20 चेंडूंत 36), राहुल तेवतिया (नाबाद 24) यांच्या फटकेबाजीमुळे संघाने 200 धावा पार केल्या.

आर्चरचा ‘त्या’ सामन्यात जलवा, या सामन्यातही जलवा, तरीही....

जोफ्रा आर्चरने मागील लढतीत पंजाब किंग्जच्या प्रियांश आर्यला पहिल्या चेंडूवरच त्रिफळाचीत केले होते. तोच कित्ता गिरवत त्याने येथील लढतीत आपल्या दुसर्‍या षटकातील पहिल्या चेंडूवर शुभमन गिलचा ऑफ स्टम्प उद्ध्वस्त करत गुजरातला जोरदार धक्का दिला; पण गुजरातच्या अन्य फलंदाजांनी फटकेबाजीवर भर देत 200 पार धावसंख्या गाठली आणि त्यानंतर सरतेशेवटी राजस्थानचे विजयाचे प्रयत्न अपयशी ठरल्याचे अधोरेखित झाले.

संक्षिप्त धावफलक

गुजरात टायटन्स : 20 षटकांत 6 बाद 217. (साई सुदर्शन 53 चेंडूंत 82, जोस बटलर, एम. शाहरूख खान प्रत्येकी 36 धावा. तुषार देशपांडे, महिश तिक्षणा प्रत्येकी 2 बळी).

राजस्थान रॉयल्स : 19.2 षटकांत सर्वबाद 159. (शिमरॉन हेटमायर 32 चेंडूंत 52, सॅमसन 41. प्रसिद्ध कृष्णा 3-24, राशीद खान 2-37, साई किशोर 2-20).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news