

अहमदाबाद; वृत्तसंस्था : गुजरात टायटन्सने इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये शुक्रवारी घरच्या मैदानावर दणदणीत विजयाची नोंद केली. सनरायझर्स हैदराबादचा काटा काढून गुजरात गुणतालिकेत 14 गुणांसह दुसर्या स्थानावर पोहोचले आहेत. त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला सरस नेट रनरेटच्या जोरावर तिसर्या क्रमांकावर ढकलले. प्रथम फलंदाजी करणार्या गुजरात संघाने 6 बाद 224 असे मोठे आव्हान उभे केले होते. सनरायझर्स हैदराबादने याचा पाठलाग करताना 6 बाद 186 अशी मजल मारली. त्यामुळे गुजरातने 38 धावांनी विजय नोंदवला.
गुजरातच्या डावाला प्रत्युत्तर देताना सनरायझर्स हैदराबादच्या अभिषेक शर्मा व ट्रॅव्हिस हेड (20) यांनी संघाला अपेक्षित सुरुवात करून देत 4.3 षटकांत 49 धावा फलकावर चढवल्या. पण, प्रसिद्ध कृष्णाने ही जोडी तोडली आणि राशीद खानने अविश्वसनीय झेल घेतला. इशान किशन 13 धावांवर बाद झाला. दोन विकेटस् पडल्याने अभिषेकवर दडपण जाणवत होते. त्याला हेन्रिच क्लासेन याने 33 चेंडूंत 57 धावांची भागीदारी करून साथ दिली. 15 व्या षटकात अभिषेक बाद झाला. त्याने 41 चेंडूंत 4 चौकार व 6 षटकारांसह 74 धावांची खेळी केली.
हैदराबादला 30 चेंडूंत 86 धावांची गरज असताना क्लासेनही 23 धावांवर बाद झाला. प्रसिद्धने ही विकेट घेतली. मोहम्मद सिराजने 17 व्या षटकात सलग दोन चेंडूंवर अनिकेत वर्मा (3) व कमिंदू मेंडिसला (0) बाद करून हैदराबादच्या आशा संपुष्टात आणल्या. पॅट कमिन्सने 19 व्या षटकात षटकार मारून धावांचे अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. पण, तो हैदराबादचा पराभव टाळू शकला नाही. हैदराबादला 6 बाद 186 धावा करता आल्या आणि गुजरातने 38 धावांनी सामना जिंकला.
तत्पूर्वी, गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शन व शुभमन यांनी पॉवर प्लेमध्ये 82 धावा उभ्या केल्या. साईने अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीच्या एका षटकात 5, तर हर्षल पटेलच्या एका षटकात 4 चौकार खेचले. त्याने टी-20 मध्ये सर्वात वेगाने 2000 धावा करणार्या आशियाई फलंदाजाचा विक्रम नावावर करताना सचिन तेंडुलकरला मागे टाकले. तो 23 चेंडूंत 9 चौकारांसह 48 धावांवर माघारी परतला.
शुभमनने मैदान दणाणून सोडले आणि त्याला जोस बटलरची साथ मिळाली. साई व शुभमन यांची 41 चेंडूंत 87 धावांची भागीदारी संपुष्टात आल्यानंतर बटलर जबरदस्त खेळला. त्याने गिलसोबत 37 चेंडूंत 62 धावा जोडल्या. त्याने आयपीएलमध्ये 4000 धावांचा टप्पा ओलांडताना मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. 13 व्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर शुभमन व बटलरची भागीदारी तुटली. गिलच्या रनआऊटवरून वाद निर्माण झाला आहे. त्याला 38 चेंडूंत 10 चौकार व 2 षटकारांसह 76 धावांवर माघारी जावे लागले.
गिलच्या विकेटनंतर काही काळासाठी गुजरातची धावगती संथ झाली होती; परंतु बटलरने हात मोकळे केले. त्याने अर्धशतकही पूर्ण केले आणि 18 व्या षटकात संघाला दोनशेपार पोहोचवले. 19 व्या षटकात बटलर 37 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकारांसह 64 धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर व शाहरुख खान यांनी संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. सुंदर 16 चेंडूंत 21 धावांवर बाद झाला. गुजरातने 6 बाद 224 धावा केल्या. जयदेव उनाडकटने 3 विकेटस् घेतल्या.
गुजरातच्या जोस बटलरनेही चांगली फटकेबाजी केली. त्याने आयपीएलमध्ये 4000 धावांचा टप्पा ओलांडला. त्याने 2677 चेंडूंत 4000 धावा केल्या आणि सर्वात जलद (चेंडूच्या बाबतीतील) हा टप्पा गाठणारा तिसरा फलंदाज ठरला. ख्रिस गेल (2658) व एबी डिव्हिलियर्स (2677) हे त्याच्या पुढे आहेत. सूर्यकुमार यादवला (2714) आज त्याने मागे टाकले.
13 व्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर एक धाव घेण्याच्या प्रयत्नात शुभमन गिल रन आऊट झाला. हर्षल पटेलने चपळाईने चेंडू यष्टिरक्षक हेन्रिच क्लासेनकडे फेकला अन् गिल क्रिजमध्ये पोहोचण्यापूर्वी बेल्स उडवल्या गेल्या होत्या. पण, स्टम्पला क्लासेनचा हात लागला की चेंडू यावरून चौथ्या अम्पायरने अनेकदा रिप्ले पाहिला. अखेर त्याने गिलला बाद दिले, पण या निर्णयावर गिल प्रचंड संतापला. त्याला 38 चेंडूंत 10 चौकार व 2 षटकारांसह 76 धावांवर माघारी जावे लागले.