MI vs GT : मुंबईच्या विजयी रथाला ‘ब्रेक’

रोमांचक सामन्यात गुजरातचा शेवटच्या चेंडूवर थरारक विजय
MI vs GT
रोमांचक सामन्यात गुजरातचा शेवटच्या चेंडूवर थरारक विजय
Published on
Updated on

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2025 स्पर्धेत मंगळवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर झालेला सामना पावसामुळे गाजला. दुसर्‍या डावात सातत्याने पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे सामना कधी मुंबईच्या, तर कधी गुजरातच्या बाजूने झुकत होता; पण अखेर गुजरातने शेवटच्या चेंडूवर हा रोमांचक सामना जिंकला. या विजयासह गुजरातने 16 गुण मिळवत पॉईंटस् टेबलमध्ये अव्वल क्रमांक मिळवला. मात्र, सलग 6 विजयांनंतर मुंबईला पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे आता मुंबई 12 सामन्यांनंतर 14 गुणांसह चौथ्या क्रमांकावर घसरले आहेत. पावसामुळे गुजरातला शेवटच्या षटकात 15 धावा करण्याचे आव्हान होते. दीपक चहरच्या या षटकातील 5 चेंडूंत राहुल तेवतिया अणि गेराल्ड कोएत्झी यांनी 14 धावा काढल्या. शेवटच्या चेंडूवर अर्शद खानने विजयी धाव घेतली. हार्दिक पंड्याचा थ्रो चुकला आणि मुंबईचे दोन गुण हुकले.

मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 155 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना गुजरात संघ फलंदाजीला उतरल्यानंतर त्यांनी फॉर्ममध्ये असलेल्या साई सुदर्शनची विकेट दुसर्‍याच षटकात गमावली. सुदर्शनला बोल्टने 5 धावांवर बाद केले; पण त्यानंतर वातावरण बदलाचा या सामन्याला फटका बसतोय की काय, असे चित्र काही काळ निर्माण झाले होते. सोसाट्याचा वारा सुटला होता. त्यामुळे शुभमन गिलने अंपायर्सकडे चिंताही व्यक्त केली; पण अंपायर्सने सामना पुढे कायम करण्यास सांगितले होते. त्यामुळे सामना पुढे सुरू राहिला.

सुरुवातीला मुंबई इंडियन्सच्या ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांनी वार्‍यामुळे त्यांना मिळालेल्या स्वींगचा चांगला वापर करत शुभमन गिल आणि जॉस बटलरला मोठे शॉटस् खेळण्यापासून दूर ठेवले होते. त्यामुळे पहिल्या 6 षटकांत गुजरात डकवर्थ लुईसनुसार मागे होते. बटलरला 12 व्या षटकात अश्वनी कुमारने 30 धावांवर बाद केले. तरी इम्पॅक्ट सब्स्टिट्यूट म्हणून मैदानात उतरलेल्या शेर्फन रदरफोर्डने आक्रमक खेळ केला. त्यामुळे गुजरातने समीकरण बदलले; पण 14 व्या षटकानंतर पावसाला अखेर सुरुवात झाली आणि अंपायर्सनी सामना थांबवला. सामना थांबला तेव्हा गुजरातने 14 षटकांत 2 बाद 107 धावा केल्या होत्या. डकवर्थ लुईस नियमानुसार गुजरात यावेळी 8 धावांनी पुढे होते.

पाऊस थांबल्याने खेळ पुन्हा सुरू झाला, बुमराहच्या षटकात चौकार मारल्यानंतर पुढचा चेंडूही तसाच मारण्याचा मोह शुभमन गिलला नडला आणि त्याच्या दांड्या उडाल्या. गिलने 46 चेंडूंत 43 धावा केल्या. येथून पुढे मुंबईने सामन्यावर पकड मिळवली. पुढच्या षटकात धोकादायक शेर्फन रदरफोर्डला बोल्टने पायचित केले. त्याने 15 चेंडूंत 28 धावा केल्या. बुमराहने आपल्या शेवटच्या षटकात शाहरूख खानचा (6) त्रिफळा उडवला. अश्वनी कुमारने राशीद खान (2) याला पायचित केले. 18 वे षटक संपल्यानंतर पावसाला पुन्हा सुरुवात झाली. यावेळी गुजरातची धावसंख्या 6 बाद 132 होती. डकवर्थ लुईस नियमानुसार गुजरात 4 धावांनी मागे होते.

यानंतर सामना साडेबारा वाजता सुरू झाला; पण एक षटक कमी करून गुजरातला एका षटकात 15 धावांचे आव्हान देण्यात आले. दीपक चहरकडे गोलंदाजीची धुरा होती, तर राहुल तेवतिया स्ट्राईकवर होता. त्याने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. दुसर्‍या चेंडूवर एक धाव आली. तिसर्‍या चेंडूवर स्ट्राईकवर आलेल्या गेराल्ड कोएत्झीने षटकार ठोकून सामना मुंबईपासून दूर नेला. चौथ्या चेंडूवर एक धाव आली. परंतु, हा नोबॉल ठरला. फ्रीहिटवर फक्त एकच रन निघाली. सामना बरोबरीत आला. पाचव्या चेंडूवर कोएत्झी बाद झाला. त्यामुळे शेवटच्या चेंडूवर एक धाव हवी होती. अर्शद खानने चेंडू जमिनीवरून टोलवला तो हार्दिकच्या हातात गेला. परंतु, पुरेसा वेळ असतानाही हार्दिक नीट थ्रो करू शकला नाही. अर्शदने विजयी रन पुरी केली आणि गुजरातला महत्त्वपूर्ण दोन गुण मिळाले.

तत्पूर्वी, या सामन्यात गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते; पण मुंबईला प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 155 धावा करता आल्या. मुंबईने रोहित शर्मा (7) व रायन रिकेल्टन (2) हे 26 धावांत माघारी परतल्यानंतर सूर्यकुमार यादव व विल जॅक्स यांनी डाव सावरला. या दोघांचे कॅच सोडण्याची चूक गुजरातला महागात पडली. साई किशोरने 11 व्या षटकात सूर्याला 35 (24 चेंडूंत 5 चौकार) धावांवर झेलबाद केले. तिसर्‍या विकेटसाठी सूर्या व विल यांनी 43 चेंडूंत 71 धावांची भागीदारी केली. जॅक्स 35 चेंडूंत 5 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 53 धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर पुन्हा एकदा मुंबईचे फलंदाज अपयशी ठरले. तिलक वर्मा (7), हार्दिक पंड्या (1), नमन धीर (7) हे पटापट बाद झाले. कॉर्बिन बॉशने 27 धावांची खेळी करून संघाला 8 बाद 155 धावांपर्यंत पोहोचवले. साई किशोरने दोन विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज, अर्शद खान, प्रसिद्ध कृष्णा, राशीद खान व गेराल्ड कोएत्झी यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news