GG vs UPW, WPL 2026 | गुजरात जायंटस्चा थरारक विजय

लॅनिंगच्या नेतृत्वाखालील वॉरियर्सला 10 धावांनी नमवले
WPL 2026
WPL 2026 | गुजरात जायंटस्चा थरारक विजयPudhari File Photo
Published on
Updated on

नवी मुंबई; वृत्तसंस्था : महिला प्रीमियर लीगमध्ये डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर शनिवारी झालेल्या चुरशीच्या हाय-स्कोअरिंग सामन्यात गुजरात जायंटस्ने यूपी वॉरियर्सचा 10 धावांनी पराभव केला. अ‍ॅश्ले गार्डनर आणि जॉर्जिया वेअरहॅम यांच्या लक्षवेधी योगदानामुळे जायंटस्ने स्पर्धेत विजयी सुरुवात केली.

प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आल्यानंतर जायंटस्ची सलामीवीर जोडी सोफी डिव्हाईन आणि बेथ मुनी यांनी संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 41 धावा जोडल्या. नंतर डिव्हाईनने 20 चेंडूंत 5 चौकार, 2 षटकारांसह 38 धावांची वेगवान खेळी केली. दोन विकेटस् झटपट पडल्यानंतर कर्णधार अ‍ॅश्ले गार्डनर आणि पदार्पण करणारी अनुष्का शर्मा यांनी 63 चेंडूंत 103 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. शर्मा 44 धावांवर बाद झाली, तर गार्डनरने आक्रमक खेळ करत 41 चेंडूंत 65 धावांची दमदार खेळी केली. डावाच्या शेवटी जॉर्जिया वेअरहॅमने केवळ 10 चेंडूंत नाबाद 27 धावांची स्फोटक खेळी केली. यात डिएंड्रा डॉटिनच्या एका षटकात मारलेल्या तीन षटकारांचा समावेश होता.

वॉरियर्सचा पाठलाग अपयशी

208 धावांच्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूपी वॉरियर्सला डब्ल्यूपीएल इतिहासातील सर्वात मोठा यशस्वी पाठलाग करण्याची संधी होती. मात्र, त्यांची सुरुवात खराब झाली. सलामीच्याच षटकात रेणुका सिंगने किरण नवगिरेला बाद केले. कर्णधार मेग लॅनिंग (30) आणि फोबी लिचफिल्ड यांनी 70 धावांची भागीदारी करत डाव सावरला. पण, वेअरहॅमने एकाच षटकात लॅनिंग आणि हरलीन देओलला बाद करून सामन्यात पुन्हा चुरस निर्माण केली.

एका बाजूने विकेटस् पडत असताना लिचफिल्डने किल्ला लढवला. तिने 40 चेंडूंत 8 चौकार आणि 5 षटकारांसह 78 धावांची उत्कृष्ट खेळी केली. श्वेता सेहरावतने 25 धावा करत तिला साथ दिली. मात्र, अखेरच्या टप्प्यात आवश्यक धावगती वाढल्याने वॉरियर्सचा संघ ढेपाळला आणि त्यांना 8 बाद 197 धावांपर्यंतच मजल मारता आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news