

अहमदाबाद; वृत्तसंस्था : अवघ्या 45 चेंडूंत 8 चौकार व 7 उत्तुंग षटकारांसह नाबाद 101 धावा फटकावणार्या तिलक वर्माच्या झंझावाती फलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सने सोमवारी आयपीएल साखळी सामन्यात तगड्या गुजरात टायटन्सचे आव्हान एकतर्फी मोडीत काढले. प्रारंभी, मुंबई इंडियन्सने 5 गड्यांच्या बदल्यात 199 धावांचा डोंगर उभा करत प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सला अवघ्या 100 धावांमध्येच गारद करत मोठा विजय नोंदवला.
प्रारंभी, युवा फलंदाज तिलक वर्माने खराब फॉर्मच्या टीकेला सडेतोड उत्तर देताना अवघ्या 45 चेंडूंमध्ये कारकिर्दीतील पहिले आयपीएल शतक ठोकले. तिलकने आपल्या 101 धावांच्या नाबाद खेळीत 8 चौकार, 7 उत्तुंग षटकार खेचले. 224.44 च्या स्ट्राईक रेटने खेळताना त्याने सनथ जयसूर्याच्या 2008 मधील विक्रमाशी बरोबरी केली. मुंबई इंडियन्ससाठी सर्वात वेगवान आयपीएल शतक झळकावणारा तो आता संयुक्तपहिला फलंदाज ठरला आहे.
विजयासाठी 200 धावांचे आव्हान असताना गुजरातकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 26 धावा केल्या. अन्य फलंदाजांनी मात्र अगदी प्रारंभापासूनच हाराकिरीचा सिलसिला कायम ठेवला. अश्वनी कुमारने 24 धावांत 4 बळी तर गझनफर, सँटेनर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. यासह गुजरातचा संघ 15.5 षटकांत अवघ्या 100 धावांमध्येच गारद झाला.
पहिल्या 22 चेंडूंत 19 धावा... पुढील 23 चेंडूंत चक्क 82 धावा!
मुंबईची 3 बाद 44 अशी दैना उडाली असताना तिलक मैदानावर उतरला होता. सुरुवातीला त्याने संयमी खेळ केला आणि 22 चेंडूंत केवळ 19 धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्याने गिअर बदलला आणि पुढच्या 23 चेंडूंमध्ये चक्क 82 धावा कुटून गुजरातच्या गोलंदाजीची चांगलीच पिसे काढली.