पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये शनिवारी (दि.20) राजस्थान आणि लखनौ यांच्यातील सामना रोमहर्षक ठरला. या सामन्यात सर्वात लक्षवेधी चेहरा ठरला तो वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) याचा. त्याचे कारणही तसेच आहे. वैभव सूर्यवंशीने केवळ १४ व्या वर्षी पदार्पण करत सर्वात कमी वयात आयपीएल खेळण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या सामन्यातील त्याच्या आत्मविश्वासपूर्वक खेळीने गुगलचे सीईओ (Google CEO) सुंदर पिचाई ( Sundar Pichai) देखील प्रभावित झाले आहेत. त्यांनी त्यांच्या 'एक्स'वर वैभव बद्दल पोस्ट शेअर केली आहे. ( Vaibhav Suryavanshi's IPL debut)
१४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीतील आत्मविश्वास पाहून गुगलचे सीईओ सुंदर पिचाई देखील त्याच्यावर प्रभावित झाले. सुंदर पिचाई यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल (X) वर वैभव सूर्यवंशीबद्दल पोस्ट शेअर केली आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी इंस्टाग्रामवर लिहिले की, 'सकाळी उठताच मी आठवीच्या वर्गातील एका मुलाला आयपीएल खेळताना पाहिले!!!! किती शानदार पदार्पण !'
वैभवने १६ वर्षे १५७ दिवसांच्या वयात आरसीबीसाठी पदार्पण करणाऱ्या प्रयत्न रे बर्मनचा विक्रम मोडला. तर, मुजीब उर रहमानने २०१८ मध्ये पंजाबकडून पदार्पण केले. त्यावेळी त्याचे वय १७ वर्षे ११ दिवस होते.
वैभवने आपल्या आयपीएल कारकीर्दीची सुरुवात धमाकेदार केली. त्याने पहिल्याच चेंडूवर षटकात खेचला. या कामगिरीमुळे त्याचा समावेश खास क्लबमध्ये झाला आहे. तसेच आयपीएल करार मिळवणाऱ्या सर्वात तरुण खेळाडूंमध्ये वैभव सूर्यवंशी आहे. राजस्थानने त्याला १ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेत संघात सामील केले. १९ वर्षांखालील कसोटीत सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रमही वैभवच्या नावावर आहे. वैभवने ५८ चेंडूत शतक झळकावले होते. १९ वर्षांखालील आशिया कपमध्ये त्याने १७६ धावा फटकावल्या होत्या तेव्हा तो खर्या अर्थाने प्रसिद्धी झोतात आला. स्थानिक क्रिकेटमध्येही त्याने त्रिशतक झळकावले होते.