

बंगळूर; वृत्तसंस्था : आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या तयारीला वेग आला आहे. संघाचा उपकर्णधार आणि कसोटी कर्णधार शुभमन गिल, वरिष्ठ फलंदाज रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज बंगळूर येथील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सेंटर ऑफ एक्सलन्स येथे दाखल झाले आहेत. येथे त्यांची फिटनेस चाचणी घेतली जाणार असून, स्पर्धेपूर्वीच्या सरावाला सुरुवात झाली आहे.
संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे होणार्या आशिया चषकासाठी भारतीय संघाचे खेळाडू 4 सप्टेंबर रोजी दुबईत एकत्र जमणार आहेत. यजमान यूएई विरुद्ध 9 सप्टेंबर रोजी होणार्या सामन्याने भारत आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. या महत्त्वपूर्ण स्पर्धेपूर्वी खेळाडूंचे फिटनेस अत्यंत महत्त्वाचे असून, त्यासाठीच ही चाचणी घेण्यात येत आहे.
तापामुळे दुलीप ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीतून माघार घ्याव्या लागलेल्या शुभमन गिलने चंदीगड येथील घरी विश्रांती घेतल्यानंतर थेट बंगळूर गाठले आहे. गिल येथूनच थेट दुबईला रवाना होण्याची शक्यता आहे. यावेळी भारतीय संघ पूर्वीप्रमाणे मुंबईत एकत्र न जमता, खेळाडू आपापल्या ठिकाणांहून थेट दुबईत दाखल होणार आहेत. यासोबतच, कसोटी आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या रोहित शर्मासाठी ही फिटनेस चाचणी महत्त्वाची ठरणार आहे.
ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौर्यावर होणार्या एकदिवसीय मालिकेसाठी (19, 23, 25 ऑक्टोबर) रोहितचा विचार केला जाऊ शकतो. मात्र, त्यापूर्वी तो ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध होणार्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये भारत ‘अ’ संघाकडून खेळणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.