

बर्मिंगहम; वृत्तसंस्था : कर्णधार शुभमन गिलचे (नाबाद 114) लागोपाठ दुसरे शतक आणि त्याला समयोचित साथ देणार्या यशस्वी जैस्वालच्या 87 धावांच्या झुंझार खेळीच्या बळावर भारताने येथील इंग्लंडविरुद्ध दुसर्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर 5 बाद 310 धावांपर्यंत मजल मारली. दिवसाचा खेळ संपला, त्यावेळी कर्णधार शुभमन गिल 216 चेंडूंत 12 चौकारांसह 114, तर रवींद्र जडेजा 67 चेंडूंत 41 धावांवर खेळत होते.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकल्यानंतर भारताला प्रथम फलंदाजीला पाचारण केले. मागील लढतीतील शतकवीर के. एल. राहुल येथे केवळ 2 धावांवर बाद झाला. 26 चेंडू खेळूनही त्याला सूर सापडला नाही आणि शेवटी चाचपडतच तो बाद झाला. तिसर्या क्रमांकावर करुण नायरने 31 धावांचे योगदान दिले. यशस्वी जैस्वालने नायरसमवेत दुसर्या गड्यासाठी 80, तर कर्णधार गिलसमवेत तिसर्या गड्यासाठी 66 धावांची भागीदारी साकारली.
यशस्वी जैस्वाल उत्तमरीत्या स्थिरावला असताना स्टोक्सच्या बाहेर जाणार्या चेंडूला छेडण्याच्या प्रयत्नात त्याने यष्टिरक्षक स्मिथकडे सोपा झेल दिला. अशा रीतीने बाद झाल्यानंतर तो स्वत:ही क्षणभर जागेवरच स्तब्ध उभा राहिला होता. यादरम्यान, शुभमन गिलने मात्र संयम व आक्रमणाचा उत्तम मिलाफ साधत या कसोटी मालिकेत लागोपाठ दुसरे शतक झळकावले आणि संघाच्या डावाला आकार देण्यात मोलाचा वाटा उचलला. पंत 25 तर नितीशकुमार रेड्डी एका धावेवर बाद झाले. शतकवीर गिलने अष्टपैलू रवींद्र जडेजासह सहाव्या गड्यासाठी 99 धावांची अभेद्य भागीदारी साकारली. इंग्लंडतर्फे ख्रिस वोक्सने 59 धावांत 2 तर कार्स, स्टोक्स व बशीर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले.