पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघ आज (दि.११) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवावर भाष्य केले. त्याचबरोबर विराट कोहली आणि केएल राहुलच्या फॉर्मबाबतही मोठे विधान केले. तसेच कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्मा खेळला नाही तर कर्णधार कोण असेल? याबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली. विराट कोहलीवर टीका करणार्या ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगलाही फटकारले.
विराट कोहली मागील काही महिने खराब फॉर्ममध्ये आहे. यावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने विराटवर टीका केली होती. याबाबत बोलताना गंभीर म्हणाले की, 'पॉन्टिंगचा भारतीय क्रिकेटशी काय संबंध? त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा विचार करायला हवा.
रोहित पहिली कसोटी खेळला नाही तर कर्णधार कोण होणार? या प्रश्नाच्या उत्तरात गंभीर म्हणाला, 'जसप्रीत बुमराह उपकर्णधार आहे. रोहित चुकला तर बुमराह कर्णधार असेल.
'मला रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या फॉर्मची चिंता वाटत नाही. ड्रेसिंग रुममधील धावांची भूक माझ्यासाठी महत्त्वाची आहे आणि मला वाटते की या दोघांनाही धावा करण्याची खूप भूक आहे. संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत जे या परिस्थितीत खेळले आहेत. हे दोघेही युवा खेळाडूंना मदत करतील. युवा खेळाडूंसाठी ही मालिका महत्त्वाची आहे.
केएल राहुलच्या फॉर्मबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर गंभीर म्हणाला, 'केएल राहुलसारखे खेळाडू किती देशांमध्ये आहेत? तो सलामीवीरही आहे तेच तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो आणि विकेटकीपिंगही करू शकतो. ते असणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत त्याचा अनुभव आम्हाला उपयोगी पडेल.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वीच्या आव्हानांबाबत बोलताना गंभीर यांनी सांगितले की, संघ बदलाच्या टप्प्यात आहे, याचा विचारही मी करत नाही. ड्रेसिंग रूममध्ये असे काही प्रतिभावंत खेळाडू आहेत जे भविष्यात मोठी कामगिरी करतील. बदल असो वा नसो, भारतीय क्रिकेटमध्ये या गोष्टी होतच राहतील.ऑस्ट्रेलियात तयारी महत्त्वाची असेल. पहिल्या कसोटीपूर्वी आगामी दहा दिवस खूप महत्त्वाचे असतील. आमचे संपूर्ण लक्ष चांगले खेळण्यावर आणि जिंकण्यावर आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वॉशिंग्टन सुंदरचा संघ आणि वेगवान गोलंदाजांच्या संघात समावेश करण्याबाबत गौतम गंभीर म्हणाला, 'जेव्हा आम्ही न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठी त्याची निवड केली तेव्हा तुम्ही या निर्णयावर टीकाही करत होता. खेळाडूंची पुढची पिढी पुढे जात आहे हे भारतीय क्रिकेटसाठी चांगले आहे. आमच्याकडे वेगातही गुणवत्ता आहे. पाचही वेगवान गोलंदाजांची कौशल्ये वेगळी आहेत. नितीश कुमार रेड्डी याचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याच्यामध्ये क्षमता आहे आणि तो निश्चितपणे भविष्यातील स्टार खेळाडूंपैकी एक आहे. आम्ही सर्वोत्तम खेळाडूंची निवड केली आहे.
ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर गंभीर म्हणाला, 'त्यांनी तयार केलेल्या विकेट्सवर आमचे नियंत्रण नाही. आम्हाला स्वतःवर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि आम्ही संघ निवडताना सर्व पाया कव्हर केला आहे. त्यांनी कोणतीही विकेट दिली, मग ती बाऊन्सी असो किंवा टर्निंग पिच असो किंवा हिरव्या गवताची विकेट असो आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी तयारी केली आहे. त्यानुसार खेळाडूंची निवड केली आहे. आमच्याकडे कोणत्याही विकेटवर कोणालाही पराभूत करण्याची क्षमता आहे, असा विश्वासही यावेळी गंभीर यांनी व्यक्त केला.