

Jemimah Rodrigues Gautam Gambhir Connection:
महिला वर्ल्डकप २०२५ च्या सेमी फायनलमध्ये भारतानं बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. भारताच्या या ऐतिहासिक विजयात सिंहाचा वाटा उचलला तो मधल्या फळतील फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्जनं! तिनं १३४ चेंडूत नाबाद १२७ धावांची खेळी केली. तिच्या या खेळीच्या जोरावरच भारतानं ऑस्ट्रेलियाचं ३३८ धावांचं मोठं आव्हान ४९ व्या षटकात पार केलं.
जेमिमाहच्या या ऐतिहासिक खेळीची तुलना २०११ च्या वर्ल्डकपमधील गौतम गंभीरच्या खेळीशी केली जात आहे. गंभीरनं २०११ च्या वर्ल्डकप फायनलमध्ये ९७ धावांची दमदार खेळी केली होती. गंभीरच्या आणि जेमिमाहच्या या खेळीमध्ये अनेक साधर्म्य शोधली जात आहेत.
विशेष म्हणजे गौतम गंभीरनं २०११ मध्ये टीम इंडियाची जी जर्सी घातली होती त्याचा नंबर ५ होता. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सेमी फायनल सामन्यात जेमिमाहनं देखील ५ नंबरची जर्सी घातली होती. गंभीर देखील त्यावेळी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. तर जेमिमाह देखील ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आली होती. भारत त्या सामन्यात देखील चेस करत होता. काल झालेल्या सामन्यात देखील भारतानं धावसंख्येचा पाठलागच केला. अजून एक योगायोग म्हणजे या दोघांच्या जर्सी या चिखलानं माखल्या होत्या.
दरम्यान, हा जर्सी, बॅटिंग क्रमांकाचा जुळून आलेला योगायोग कोलकाता नाईट रायडर्सनं आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. त्यांनी गंभीर आणि जेमिमाहचा फोटो शेअर करत त्याला, 'वर्ल्डकपमध्ये बॅटिंग क्रमांक ३ हा नंबर १ झालाय.' असं कॅप्शन दिलं.
जेमिमाह रॉड्रिग्ज ही आयीसी महिला वर्ल्डकप नॉक आऊट्समध्ये शतक ठोकणारी दुसरी महिला बॅटर ठरली आहे. यापूर्वी इंग्लंडच्या नॅट सिव्हर ब्रंटनं अशी कामगिरी केली होती. मात्र २०२२ मध्ये केलेलं ब्रंटच शतक वाया गेलं होतं. जेमिमाहच्या खेळीमुळं भारताचा विजय झाला आहे.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर ऑस्ट्रेलियानं भारतासमोर ३३९ धावांचं आव्हान ठेवल्यानंतर भारताची सुरूवात खराब झाली होती. भारताची अवस्था २ बाद ५९ धावा अशी झाली होती. मात्र जेमिमाहनं डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. तिनं कर्णधार हरमनप्रीतसोबत १६७ धावांची भागीदारी रचली. हरमनप्रीतनं ८८ चेंडूत ८९ धावांची खेळी केली. या दोघींची ही भारताकडून वर्ल्डकप बाद फेरीत केलेली सर्वोच्च भागीदारी ठरली.
यानंतर रिचा घोषनं १६ चेंडूत २६ धावांचं योगदान दिलं. तर अमनज्योत कौरनं ८ चेंडूत १५ धावा केल्या. भारतानं पाच विकेट्स आणि ९ चेंडू शिल्लक ठेवून हा सामना जिंकला. आता भारत रविवारी (२ नोव्हेंबर) अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेविरूद्ध भिडणार आहे.