मुंबई : पुढारी ऑनलाईन
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आपल्या कॉमेंट्री पॅनेलमधून समितीतून माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांना हटवले आहे. ते बर्याच दिवसांपासून बीसीसीआयच्या कॉमेंट्री पॅनेलमध्ये एक महत्त्वाचा भाग होते. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर मांजरेकर आयपीएलच्या १३ व्या सीझनमध्ये कॉमेंट्री करताना दिसणार नाहीत.
१२ मार्च रोजी दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात संजय मांजरेकर हे कॉमेंट्री करताना दिसले नव्हते. मात्र, हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. मांजरेकर यांच्या व्यतिरिक्त सुनील गावस्कर, एल. शिवरामकृष्णन आणि मुरली कार्तिक हे बीसीसीआयच्या कॉमेंट्री पॅनेलचे सदस्य आहेत. या तिघांचीही गच्छंती होण्याची शक्यताही काही जणांनी व्यक्त केली आहे.
बीसीसीआयने मांजरेकर यांच्यावर का कारवाई केली याबाबत स्पष्ट कारण समोर आलेले नाही. पण, बीसीसीआय मांजरेकर यांच्यावर नाखूश असल्याची चर्चा क्रिकेट वर्तृळात आहे.
मांजरेकर यांनी १९९६ मध्ये क्रिकेटमधून निवृत्त घेतली. त्यानंतर ते गेल्या ३ विश्वचषक स्पर्धा आणि आयसीसीच्या सर्व मोठ्या स्पर्धांमध्ये कॉमेंट्री पॅनलचे सदस्य होते.