पुढारी ऑनलाईन : ऑस्ट्रेलियाचा उदयोन्मुख सलामीवीर, अशी ओळख असलेला क्रिकेटपटू विल पुकोव्स्की ( Will Pucovski) याने वयाच्या २७ व्या वर्षी निवृत्ती घेतली आहे. त्याच्या या निर्णयाने ऑस्ट्रेलियन क्रिकेटविश्वाला धक्का बसला आहे. इतक्या लहान वयात त्याने क्रिकेटला निरोप का दिला? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आपल्या निर्णयामागील कारणही पुकोव्स्कीने माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
विल पुकोव्स्कीने ३६ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्यामध्ये ४५.१९ च्या सरासरीने २३५० धावा त्याच्या नावावर आहेत. यामध्ये सात शतकांचा समावेश आहे. २०२०/२१ हंगामात सिडनी येथे भारताविरुद्ध तो एकमेव कसोटी सामना खेळला होता. या सामन्यात त्याने दोन डावांमध्ये अनुक्रमे ६२ आणि १० धावा केल्या होत्या. ज्या वयात अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकत नाहीत त्या वयात पुकोव्स्कीला क्रिकेटमधून निवृत्त व्हावे लागले आहे.
विल पुकोव्स्कीने एकदा किंवा दोनदा नाही तर १३ वेळा चेंडू डोक्यावर घेतला आहे. त्याला शाळेच्या दिवसांपासून ही समस्या आहे. कधी फुटबॉल तर कधी क्रिकेटचा चेंडू त्याच्या डोक्यावर आदळला chj;. आंतरराष्ट्रीय आणि व्यावसायिक क्रिकेटमध्येही चेंडू त्याच्या डोक्यावर अनेकदा लागला. मार्च २०२४ मध्ये पुकोव्स्कीच्या डोक्यावर चेंडू लागला होता, त्यानंतर त्याची प्रकृती खूपच गंभीर झाली होती. शेफील्ड शील्ड सामन्यादरम्यान पुकोव्स्कीच्या हेल्मेटवर चेंडू आदळल्याने तो जखमी होऊन निवृत्त झाला. यामुळे तो ऑस्ट्रेलियाच्या उन्हाळी हंगामातील उर्वरित सामने खेळू शकला नाही. यामुळे त्याला काउंटी क्रिकेटही सोडावे लागले. अखेर तज्ञांच्या पॅनेलच्या शिफारशीनंतर पुकोव्स्कीला क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यास भाग पडले.
माध्यमांशी बोलताना पुकोव्स्की म्हणाला, "मी पुन्हा क्रिकेट खेळणार नाही. शक्य तितक्या सोप्या भाषेत सांगायचे तर, हे वर्ष खरोखरच कठीण गेले आहे. मला वाटते की संपूर्ण प्रवासाबद्दल सांगण्यासाठी मला काही तास लागतील; परंतु साधा संदेश असा आहे की मी पुन्हा कोणत्याही स्तरावर क्रिकेट खेळणार नाही. कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंचा एक मोठा गट आहे. दुर्दैवाने, माझा प्रवास इथेच संपतो."