

लॉस एंजलिस; वृत्तसंस्था :
३ देश, १६ स्टेडियम्स, पण गवत मात्र अगदी सारखं! यंदाच्या फिफा वर्ल्ड कपमध्ये खेळाडू ज्या खेळपट्टीवर गोल करत आहेत, ते गवत थेट प्रयोगशाळेतून शास्त्रज्ञांनी तयार केले आहे. ८ वर्षांचं संशोधन, १७० हून अधिक प्रयोग आणि ४७ कोटी रुपयांचा खर्च... अशा पार्श्वभूमीवर मियामीच्या उष्णतेपासून ते सिटलच्या थंडीतही हिरवेगार राहणाऱ्या या ‘स्मार्ट गवताची’ ही रंजक गोष्ट!
३ देश आणि हवामानाचे मोठे आव्हान यावेळचा विश्वचषक तीन देशांमधील १६ वेगवेगळ्या शहरांत होत आहे. मेक्सिको सिटीमधील अतिउंचावरील हवामान, मियामीमधील उष्णता, तर सिटलमधील थंड हवामान अशा टोकाच्या वातावरणात प्रत्येक स्टेडियमवर खेळाडूंना खेळण्याचा एकसारखाच अनुभव मिळणे हे शास्त्रज्ञांसमोर मोठे आव्हान होते. तसेच, यातील ८ स्टेडियम्स हे आधी कृत्रिम लॉनचे होते, जिथे फिफाच्या नियमांनुसार तात्पुरते नैसर्गिक गवत बसवणे गरजेचे होते.
या आव्हानाचा सामना करण्यासाठी मिशियन स्टेट युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ टेनेसेमधील वनस्पती शास्त्रज्ञांच्या टीमने तब्बल ८ वर्षे संशोधन केले. शास्त्रज्ञांनी विविध प्रकारच्या गवतांवर १७० हून अधिक प्रयोग केले. अखेर ८४ टक्के ‘केंटकी ब्लूग्रास’ आणि १६ टक्के 'रे ग्रास' यांचे मिश्रण करून फिफासाठी सर्वात परिपूर्ण असे गवत विकसित करण्यात आले. शास्त्रज्ञांच्या या अभूतपूर्व तंत्रज्ञानामुळे यंदाच्या फिफा विश्वचषकात खेळाडूंना दुखापतींशिवाय आपला सर्वोत्तम खेळ दाखवता येत असून, क्रीडा जगतात या ‘पिच इंजिनिअरिंग'चे मोठे कौतुक होत आहे.
मुळांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी आणि मुसळधार पाऊस पडल्यास खेळपट्टीवरील अतिरिक्त पाणी अवघ्या काही मिनिटांत खेचून घेण्यासाठी स्टेडियमच्या खाली आधुनिक व्हॅक्यूम पाईप्स बसवले आहेत.
शेतामध्ये विशेष लागवड : हे गवत थेट स्टेडियममध्ये न उगवता, आधी वेगवेगळ्या टर्फ फार्म्सवर (गवताच्या शेतांमध्ये) वाळूच्या थरावर अत्यंत दाट पद्धतीने वाढवले गेले.
सिंथेटिक फायबरची जोड : गवत उपटून खराब होऊ नये म्हणून नैसर्गिक गवताच्या मुळांशी सिंथेटिक फायबर्स जोडण्यात आले. यामुळे जमिनीची पकड मजबूत राहते.
कोल्ड चेन ट्रान्सपोर्ट : गवत पूर्ण वाढल्यानंतर ते कार्पेटसारखे गोल गुंडाळून २० मीटरच्या पट्ट्यांमध्ये कापले गेले. प्रवासातील उष्णतेमुळे गवत सुकू नये म्हणून ते हजारो किलोमीटर दूर असलेल्या स्टेडियम्सपर्यंत रेफ्रिजरेटेड (एसी) ट्रक्समधून नेण्यात आले.
ज्या स्टेडियम्सना छत आहे आणि जिथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही, तिथे गवताची वाढ निरोगी ठेवण्यासाठी मोठ्या कृत्रिम दिव्यांचा वापर केला जात आहे.