FIFA World Cup 2026 | अर्जेंटिना-स्‍पेन यांच्‍यात आज रंगणार फिफा वर्ल्डकपचा ‘ग्रँड फिनाले’; ‘वन लास्‍ट डान्‍स’!

अर्जेंटिना इतिहास रचणार की, मेस्सीचा विजयरथ स्पेन रोखणार?
FIFA World Cup 2026
FIFA World Cup 2026 | अर्जेंटिना-स्‍पेन यांच्‍यात आज रंगणार फिफा वर्ल्डकपचा ‘ग्रँड फिनाले’; ‘वन लास्‍ट डान्‍स’!
Published on
Updated on

म्युनिच; वृत्तसंस्‍था :

फुटबॉल जगतातील सर्वात प्रतिष्ठेच्या फिफा विश्वचषकाचा थरारक अंतिम सामना आता अवघ्या काही तासांवर आला असून, संपूर्ण जगाचे या ऐतिहासिक महामुकाबल्याकडे लक्ष्‍य लागले आहे. एकीकडे अर्जेंटिनाची आक्रमक खेळी आणि पुनरागमन करण्याची क्षमता, तर दुसरीकडे स्पेनची अभेद्य भिंत आणि उत्कृष्ट बचाव, यामुळे हा सामना कमालीचा चुरशीचा होईल, असे संकेत आहेत. या सामन्‍याच्‍या निमित्ताने अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्‍सी व स्‍पेनचा यमाल या सुपरस्‍टार खेळाडूंतही स्‍वतंत्र जुगलबंदी रंगणे अपेक्षित आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १२.३० वाजता या लढतीला सुरुवात होईल.

एका बाजूला सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर नाव कोरून इतिहास रचण्याचा अर्जेंटिनाचा निर्धार आहे, तर दुसऱ्या बाजूला मेस्सीची विजयी घोडदौड रोखून विश्वविजेतेपदाचा मुकुट खेचून आणण्यासाठी स्पेनची ‘यंग ब्रिगेड’ सज्ज झाली आहे. अर्जेंटिनासाठी हा सामना ऐतिहासिक ठरणार आहे. १९५८ आणि १९६२ मध्ये ब्राझीलने सलग दोनदा विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर हा पराक्रम करणारा अर्जेंटिना पहिला देश ठरू शकतो. मेस्सीच्या संघाने २०२१ ची कोपा अमेरिका, २०२२ चा विश्वचषक आणि २०२४ ची कोपा अमेरिका जिंकून आधीच फुटबॉल जगतावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. जर अर्जेंटिनाने रविवारी विजय मिळवला, तर त्यांचे हे सलग चौथे मोठे आंतरराष्ट्रीय जेतेपद ठरेल.

स्‍पेनने यंदा स्‍वीकारला एकच गोल!

या संपूर्ण स्पर्धेत ७ सामन्यांमध्ये स्पेनने केवळ एकच गोल स्वीकारला आहे. उपांत्य फेरीत बलाढ्य फ्रान्सविरुद्ध त्यांनी चेंडूवर ताबा ठेवत सामन्यावर पूर्ण नियंत्रण राखले. स्पेन गेल्या १७ सामन्यांत अपराजित असून, त्यांनी सलग ६ सामने जिंकले आहेत. साहजिकच, आजच्‍या लढतीत स्‍पेनचे संरक्षण भेदणे हेच अर्जेंटिनासमोर मुख्‍य आव्‍हान असेल.

विश्वचषक जिंकलो, तर निवृत्त होणार!

जर स्पेनने विश्वविजेतेपदाचा मुकुट पटकावला, तर आपण आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून संन्यास घेऊ, अशी घोषणा स्पेनचा स्टार लेफ्ट-बॅक मार्क कुकुरेल्ला याने रविवारी अर्जेंटिनाविरुद्ध होणाऱ्या महामुकाबल्यापूर्वी केली. आश्‍चर्य म्‍हणजे हा खेळाडू अवघ्‍या २७ वर्षांचा आहे.

थोडक्‍यात महत्त्वाचे जेव्हा स्पेनचा संघ घरच्या मैदानावर

१-० अशी आघाडी घेतो, तेव्हा ते ७७ टक्के सामने जिंकतात, असे आजवरच्‍या सामन्‍यातून दिसून आले आहे.

जेव्हा अर्जेंटिनाचा संघ घरच्‍या मैदानाबाहेर खेळत असताना ०-१ अशा पिछाडीवर पडतो, त्‍यावेळी ते हमखास १०० टक्‍के सामने जिंकतात, असेही अधोरेखित झाले आहे.

या दोन्ही संघांमध्ये झालेल्या शेवटच्या सामन्यात स्पेनने विजय मिळवला होता. या दोन संघांमधील सामन्यांमध्ये पहिल्या सत्रात सरासरी १.८ गोल होतात, असे आकडेवारीवरून दिसून येते.

आम्ही स्पेनच्या खेळाचा सखोल अभ्यास केला आहे. अंतिम सामन्यात विजय मिळवण्यासाठी आम्हाला आमचा आतापर्यंतचा सर्वोत्तम खेळ साकारावा लागेल. गुणवत्तेच्या जोरावर आम्‍ही इथवर पोहोचलो आहे; पण इथेही आम्‍हाला सर्व आघाड्यांवर सतर्क राहावेच लागेल.

अर्जेंटिनाचे मुख्य प्रशिक्षक लिओनेल स्कलोनी

आजचा सामना फुटबॉलची रोमांचकता दर्शवणारा असेल. दोन्ही संघ जागतिक दर्जाचे असून, त्यांच्या खेळण्याच्या शैलीत आणि खेळाडूंच्या प्रतिभेत कमालीचे साम्य आहे. या सामन्यात बचावात्मक खेळापेक्षा प्रतिभा, गुणवत्ता आणि आक्रमक फुटबॉलचा विजय होईल.
स्पेनचे मुख्य प्रशिक्षक लुईस डी ला फुएन्टे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news