

केपटाऊन; वृत्तसंस्था : ‘भगवान देता हैं तो छप्पर फाड के’, असे उगीच म्हणत नाहीत, याचा प्रत्यय एका क्रिकेट चाहत्याला येथील केपटाऊन टी-20 लीगमध्ये आला. तसे पाहता, एखादा सामना पाहण्याठी थेट स्टेडियम गाठणार्या चाहत्यांची सर्वसाधारण अपेक्षा हीच असते की, सामन्यात उत्तम जुगलबंदी रंगावी आणि आपल्या संघाच्या गळ्यात यशश्रीची माळ पडावी. एमआय केपटाऊन आणि डर्बन सुपर जायंटस् लढतीचाही याला अपवाद नव्हता. हजारो चाहते येथे सामन्याचा आनंद लुटण्यासाठीच स्टेडियममध्ये पोहोचले होते; पण याच लढतीत गॅलरीतील या चाहत्याचे नशीब चांगलेच फळफळले.
याचे कारण म्हणजे या चाहत्याने स्टँडसमध्ये टिपलेला रिकेल्टनचा एकहाती क्लीन कॅच आणि यासाठी त्याला मिळालेले चक्क 1.7 कोटींचे रोख इनाम! या एका झेलाने तो चक्क काही सेकंदात कोट्यधीश झाला!
दक्षिण आफ्रिकेतील ‘टी-20’ लीगच्या सलामी लढतीत हे नाट्य घडले. एमआय केपटाऊन आणि डर्बन सुपर जायंटस् यांच्यातील या लढतीत एकूण 449 धावा कुटल्या गेल्या.एमआय केपटाऊनचा सलामीवीर रायन रिकेल्टनने 65 चेंडूंत 113 धावांची धडाकेबाज खेळी केली. 13 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रिकेल्टनने मारलेला षटकार प्रेक्षक गॅलरीतील एका चाहत्याने एक हाताने टिपला. या एका झेलमुळे त्या चाहत्याला 2 दशलक्ष रँड (सुमारे 1.8 कोटी भारतीय रुपये) मिळाले.
एसए टी-20 स्पर्धेच्या नियमानुसार, जर एखाद्या चाहत्याने सीमारेषेबाहेर एकहाती क्लीन कॅच टिपला, तर त्याला मोठी बक्षीस रक्कम दिली जाते. मात्र, हा झेल केवळ एकाच हाताने टिपावा आणि तो क्लीन कॅच असावा, अशी अट असते. या दोन्ही अटी पार केल्याने हा चाहता काही सेकंदात कोट्यधीश झाला.