

दुबई : क्रिकेटच्या मैदानावर काही ना काही मजेदार घटना घडत असतात. अशीच घटना दुबईत सुरू असलेल्या अबूआबी टी- 10 टूर्नामेंटमध्ये घडली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला 40 वर्षीय फाफ डू प्लेसिसशी संबंधित याचा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला.
प्लेसिस सध्या अबूधाबी टी-10 लीगमध्ये मॉरिसविले सॅम्प आर्मी संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. मंगळवारी दिल्ली बुल्सविरुद्ध सामन्यात चौकार अडवण्यासाठी प्लेसिस सीमारेषेच्या दिशेने धावत असताना तेथे बॉल बॉय होता. चेंडू पकडण्यासाठी बॉल बॉय वाकला; परंतु डू प्लेसिसचा पळण्याचा वेग एवढा होता की त्याला स्वतःला सावरता आले नाही.
एकवेळ तर डू प्लेसिस बॉल बॉयला धडकणारच होता. पण, त्याचवेळी तो मुलगा उठला आणि डू प्लेसिसला जणू त्याने उचलून सीमारेषेबाहेर फेकले असेल, असे मजेदार द़ृश्य कॅमेर्यात कैद झाले. यावेळी जवळच उभा असलेला सुरक्षारक्षक प्लेसिसच्या मदतीला धावला आणि प्लेसिस तिथून हसत हसत निघून गेला!