

नॉटिंगहॅम : येथील ट्रेंट ब्रिज मैदानावर तिसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडने फलंदाजीचा धडाका लावत भारताचा तब्बल १२५ धावांनी नामुष्कीजनक पराभव केला.
सुरुवातीच्या अडचणींवर मात करत इंग्लंडने निर्धारित २० षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात २०१ धावांचा डोंगर उभारला. सलामीवीर फिल सॉल्टचे धडाकेबाज अर्धशतक आणि अष्टपैलू सॅम कुरेनच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर इंग्लंडला ही धावसंख्या गाठता आली. सॉल्टने अवघ्या ४४ चेंडूंत ७० धावांची तुफानी खेळी केली. कुरेनने अवघ्या २४ चेंडूंत नाबाद ४१ धावा कुटत इंग्लंडला दोनशेचा टप्पा ओलांडून दिला. शेवटच्या ८ षटकांत इंग्लंडच्या फलंदाजांनी ८९ धावा वसूल केल्या.
इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या २०१ धावांचा पाठलाग करताना भारताने पावरप्ले मधेच नांगी टाकली. अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांच्याकडून फार अपेक्षा होत्या. मात्र दोघंही फेल गेले. तर मधल्या फळीची कमकुवत फलंदाजी पुन्हा एकदा अधोरेखित झाली. अभिषेक शर्मा १० आणि वैभव सूर्यवंशी १३ धावा करून बाद झाले. भारताने पावरप्लेच्या ६ षटकात पाच गडी गमवून फक्त ५४ धावा केल्या होत्या. त्यामुळे पराभव हा निश्चित झाला होता. भारताचा संपूर्ण डाव अवघ्या ११.४ षटकांत केवळ ७६ धावांत गुंडाळला गेला. भारताच्या केवळ चार फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना पुरते जेरीस आणले. जोश टंगने सर्वाधिक ४ बळी तर जोफ्रा आर्चरने ३ बळी घेतले. धावांच्या फरकाने भारताचा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा दुसरा सर्वात मोठा पराभव ठरला.