
एजबॅस्टन : कर्णधार शुभमन गिलची झंझावाती 161 धावांची खेळी आणि त्याला जडेजाची मिळालेली समयोचित साथ या बळावर भारताने आपला दुसरा डाव 6 बाद 427 धावांवर घोषित केला आणि इंग्लंडला 608 धावांचे टार्गेट असताना त्यांना चौथ्या दिवसअखेर 3 बाद 72 असे रोखूनही धरले. भारताला या लढतीत विजयासाठी आता केवळ 7 गडी बाद करायचे आहेत तर इंग्लंडला अशक्यप्राय विजय काबीज करायचा असेल तर त्यासाठी आणखी 536 धावांची रास ओतावी लागणार आहे. शनिवारी चौथ्या दिवसाचा खेळ संपला, त्यावेळी पोप 24 तर हॅरी ब्रुक 15 धावांवर नाबाद राहिले.
विजयासाठी 608 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला प्रारंभीच काही धक्के सोसावे लागले. सलामीवीर झॅक क्राऊलीला सिराजने बदली खेळाडू साई सुदर्शनकरवी झेलबाद केले. क्राऊलीने त्यावेळी अगदी खातेही उघडले नव्हते. त्यानंतर संघाच्या खात्यावर अवघ्या 30 धावा असताना बेन डकेट 25 धावांवर आकाश दीपच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. जो रुटचा आकाश दीपने त्रिफळा उडवत आणखी एक यश मिळवले, त्यावेळी भारतासाठी खर्या अर्थाने मोठा अडसर दूर झाला. आता रविवारी या सामन्याच्या शेवटच्या दिवशी उर्वरित 7 फलंदाज शक्य तितक्या लवकर गारद करत विजय खेचून आणण्याचा भारतीय संघाचा निर्धार असणार आहे.
हेडिंग्ले येथील पहिल्या कसोटीतील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय गोलंदाजी टीकेच्या केंद्रस्थानी होती. तथापि, दुसर्या कसोटीत प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाने गोलंदाजीत उत्कृष्ट पुनरागमन करत प्रभावी कामगिरी केली. पहिल्या डावात इंग्लंडचे तब्बल सहा फलंदाज शून्यावर बाद झाले, जी इंग्लंडच्या कसोटी क्रिकेट इतिहासातील एक लाजिरवाणी नोंद आहे. आता दुसर्या डावातही यजमान संघ पूर्णपणे दबावाखाली आला आहे.
दिवसाची सुरुवात भारतासाठी खराब झाली आणि त्यांनी करुण नायर व के.एल. राहुल यांच्या विकेटस् लवकर गमावल्या. मात्र, त्यानंतर शुभमन गिलने सूत्रे हाती घेत पुन्हा एकदा ऐतिहासिक खेळी साकारली. भारताच्या नवनियुक्त कसोटी कर्णधाराने 161 धावांची सनसनाटी खेळी केली. यासह एकाच कसोटी सामन्यात सलग दोन 150 पेक्षा जास्त धावा करणारा अॅलन बोर्डर नंतरचा तो केवळ दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. तसेच, एका कसोटी सामन्यात सर्वाधिक एकत्रित धावा करणार्या फलंदाजांच्या यादीत तो दुसर्या स्थानी पोहोचला आहे.
गिलने या सामन्यात 430 धावांचा विक्रम प्रस्थापित केला. गिलने यावेळी 1971 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध सुनील गावसकर यांनी केलेल्या 344 धावांचा विक्रम मोडला आहे. गिलने कर्णधार म्हणून चार डावांत 585 धावांचे योगदान दिले आहे. येथील दुसर्या डावात गिलने 162 चेंडूत 161 धावा चोपल्या. यात 13 चौकार व 8 उत्तुंग षटकारांचा समावेश आहे.
* शुभमन गिलची 161 धावांची झंझावाती, विक्रमी शतकी खेळी
* कसोटीतील दोन्ही डावांत शतकांचा विक्रम
* चार डावांतील तिसरे शतक
* इंग्लिश गोलंदाजांची धूळधाण उडवत अनेक विक्रमांची आतषबाजी