

मँचेस्टर; वृत्तसंस्था : इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने झळकावलेले दीडशतक आणि कर्णधार बेन स्टोक्सच्या अर्धशतकाच्या जोरावर यजमान संघाने चौथ्या कसोटी सामन्यावर आपली पकड पूर्णपणे घट्ट केली आहे. रूटच्या 150 धावांच्या खेळीमुळे इंग्लंडने पहिल्या डावात धावांचा डोंगर उभा करीत भारतावर तिसर्या दिवसअखेरीपर्यंत 186 धावांची आघाडी घेतली आहे. संपूर्ण दिवसावर जो रूटने वर्चस्व गाजवले. दिवसाच्या अखेरच्या सत्रात भारताला काही यश मिळाले असले, तरी तोपर्यंत इंग्लंडने सामन्यात आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडच्या 7 बाद 544 धावा झाल्या होत्या. स्टोक्स 77, तर डॉवसन 21 धावांवर नाबाद होते. रूटने दीड शतक झळकावताना कसोटी कारकिर्दीतील 38 व्या शतकाची नोंद केली. या खेळीत त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली. तो आता शतकांच्या बाबतीत सचिन तेंडुलकर, जॅक कॅलिस आणि रिकी पाँटिंग यांच्यानंतर चौथ्या क्रमांकावर आलेला आहे. तर धावांच्या बाबतीत तो सचिननंतर दुसर्या क्रमांकावर पोहोचला आहे.
सामन्याच्या तिसर्या दिवशी 2 बाद 225 धावसंख्येवरून पुढे खेळताना इंग्लंडने पहिल्याच तासात बिनबाद 41 धावा जोडल्या. जेम्स अँडरसन एंडकडून काही चेंडू खाली राहत होते, तर दुसर्या बाजूने काही चेंडूंना अनपेक्षित उसळी मिळत होती. मात्र, याचा फायदा उचलण्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरले. उपहाराला डाव थांबला तेव्हा इंग्लंडने 2 बाद 332 धावा केल्या होत्या.
उपहारानंतर खेळाला सुरुवात होताच भारतीय संघाला दिवसातील पहिले यश मिळाले. सकाळच्या सत्रात अभेद्य वाटणारी जो रूट आणि ओली पोपची जोडी फोडण्यात वॉशिंग्टन सुंदरला यश आले. सुंदरच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात ओली पोप (71) स्लिपमध्ये के. एल. राहुलकडे झेल देऊन बाद झाला. पोप आणि रूट यांनी तिसर्या गड्यासाठी 135 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.
पोप बाद झाल्यानंतर आलेल्या हॅरी ब्रूकलाही सुंदरने फार काळ टिकू दिले नाही. पुढे येऊन मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात ब्रूक (3) यष्टिरक्षक ध्रुव ज्युरेलकरवी यष्टीचीत झाला. 82 व्या षटकात 349 धावांवर इंग्लंडने आपली चौथी विकेट गमावली. सुंदरने लागोपाठ दोन धक्के देत भारतीय संघात चैतन्य निर्माण केले. मात्र, या पडझडीचा दुसर्या बाजूने फलंदाजी करणार्या जो रूटवर कोणताही परिणाम झाला नाही. त्याने आपली संयमी खेळी सुरू ठेवत संघाचा डाव सावरला. 87 व्या षटकात इंग्लंडने भारताच्या 358 धावांचा आकडा पार करत आघाडी घेतली. त्यानंतर रूट आणि स्टोक्स या दोघांनी भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवला. रूटने आपले 38 वे कसोटी शतक पूर्ण करत भारताविरुद्ध सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. त्याला उत्तम साथ देत कर्णधार स्टोक्सनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. दोघांच्या दमदार भागीदारीमुळे इंग्लंडने भारताच्या 358 धावांना मागे टाकत मोठी आघाडी घेतली.
इंग्लंडचा संघ मजबूत स्थितीत असतानाच कर्णधार बेन स्टोक्सला (66) धावताना त्रास होऊ लागल्याने त्याला रिटायर्ड हर्ट होऊन मैदान सोडावे लागले. त्यावेळी इंग्लंडची धावसंख्या 4 बाद 491 अशी होती. स्टोक्स माघारी परतल्यानंतरही रूटने आपली आक्रमक खेळी सुरू ठेवली आणि दीडशतक पूर्ण केले. अखेर रवींद्र जडेजाने भारताला मोठे यश मिळवून दिले. त्याने 150 धावांवर खेळणार्या जो रूटला बाद करत इंग्लंडला पाचवा धक्का दिला. रूट बाद झाला तेव्हा इंग्लंडने 500 धावांचा टप्पा ओलांडला होता.
त्यानंतर आलेल्या जेमी स्मिथला (9) जसप्रीत बुमराहने यष्टिरक्षक ध्रुव ज्युरेलकरवी झेलबाद केले. बुमराहचे या सामन्यातील हे पहिलेच यश होते. पाठोपाठ मोहम्मद सिराजने ख्रिस वोक्सला (4) तंबूचा रस्ता दाखवत इंग्लंडला सातवा धक्का दिला. यानंतर बेन स्टोक्स पुन्हा खेळायला आला. त्याने आणि लियाम डॉवसनने उरलेला डाव खेळून काढला. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडच्या 7 बाद 544 धावा झाल्या होत्या. स्टोक्स 77, तर डॉवसन 21 धावांवर नाबाद होते. भारताकडून जडेजा आणि सुंदरने प्रत्येकी 2 विकेटस् घेतल्या.