

बासेल; वृत्तसंस्था : इंग्लंडच्या महिला फुटबॉल संघाने युरो 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्पेनवर 3-1 अशा पेनल्टी शूटआऊटने विजय मिळवत सलग दुसर्यांदा युरोपियन चषकावर आपले नाव कोरले. बासेल, स्वित्झर्लंड येथील सेंट जेकब पार्क स्टेडियमवर झालेल्या या थरारक सामन्यात दोन्ही संघांनी 1-1 अशी बरोबरी साधली होती, मात्र पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडने बाजी मारली.
सामन्याच्या 25 व्या मिनिटाला स्पेनच्या मारिओना काल्डेन्टेने हेडरद्वारे आघाडी मिळवली; परंतु इंग्लंडच्या अलेसिया रुसोने 57 व्या मिनिटाला क्लो केल्लीच्या क्रॉसवर गोल करत बरोबरी साधली. दोन्ही संघांनी 120 मिनिटे झुंज दिल्यानंतर निकाल लागला नाही, त्यामुळे सामना पेनल्टी शूटआऊटकडे गेला.
पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडच्या गोलरक्षक हॅना हॅम्पटनने दोन अप्रतिम बचाव करत संघाला आघाडी मिळवून दिली. निर्णायक क्षणी क्लो केल्लीने विजयी पेनल्टी गोल केला आणि इंग्लंडच्या चाहत्यांमध्ये जल्लोष उसळला. या विजयामुळे इंग्लंडने 2022 नंतर पुन्हा युरो विजेतेपद पटकावले. संघाच्या कर्णधाराने आणि खेळाडूंनी टीम स्पिरीट आणि जिद्दीचे कौतुक केले. इंग्लंडच्या या ऐतिहासिक विजयाचे पंतप्रधान, राजघराणे आणि जगभरातील फुटबॉलप्रेमींनी अभिनंदन केले आहे.