

Duleep Trophy 2025 : यष्टीरक्षक-फलंदाज नारायण जगदीशनच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर दक्षिण विभागाने उत्तर विभागाविरुद्धचा उपांत्य सामना अनिर्णित ठेवत आज (दि. ७) दुलीप ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली. पहिल्या डावातील आघाडीच्या आधारावर दक्षिण विभागाने अंतिम फेरी गाठली असून, आता ११ सप्टेंबर रोजी बेंगळुरूमध्ये त्यांचा सामना मध्य विभागाशी होणार आहे.
नाणेफेक जिंकत उत्तर विभागाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जगदीशनने ३५२ चेंडूत १९७ धावा (१६ चौकार, २ षटकार) करत डावाची भक्कम पायाभरणी केली. त्याला देवदत्त पडिक्कल (५७ धावा, ७१ चेंडूत, ७ चौकार), रिकी भुई (५४ धावा, १३१ चेंडूत, ३ चौकार, २ षटकार) आणि तनय थ्यागराजन (५८ धावा, ११६ चेंडूत, ४ चौकार) यांची मोलाची साथ लाभली. त्यामुळे दक्षिण विभागाने पहिल्या डावात १६९.२ षटकांत ५३६ धावांचा डोंगर उभारला होता.उत्तर विभागाकडून निशांत सिंधूने ४७.२ षटकांत १२५ धावा देऊन ५ बळी घेत चमक दाखवली.
उत्तर विभागाच्या फलंदाजांनीही प्रयत्न केला. शुभम खजुरियाने २५२ चेंडूत १२८ धावांची खेळी (२० चौकार, १ षटकार) तर निशांत सिंधूने १४८ चेंडूत ८२ धावा (८ चौकार, १ षटकार) केली. मात्र तरीही उत्तर विभागाचा डाव १००.१ षटकांत ३६१ धावांवर आटोपला आणि ते १७५ धावांनी पिछाडीवर राहिले. दक्षिण विभागासाठी गुरजपनीत सिंहने ४/९६ तर एम.डी. निधीशने ३/६४ अशी कामगिरी बजावली. पुन्हा फलंदाजीची संधी मिळाल्यावर दक्षिण विभागाने ९५/१ धावा केल्या. जगदीशनने ६ चौकारांसह नाबाद ५२ धावा (६९ चेंडूत) तर पडिक्कलने नाबाद १६ धावा केल्या. त्यामुळे सामना अनिर्णित सुटला. या सामन्यातील दोन्ही डावांमध्ये दमदार खेळी करणारा नारायण जगदीशन याला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आले.