लंडन : पुढारी ऑनलाईन
इंग्लंडचा कर्णधार जो रुटने कोरोना व्हायरसची बाधा होऊ नये म्हणून म्हणून आगामी श्रीलंका दौऱ्यावर खेळाडू हस्तांदोलन करणार नाहीत असे सांगितले. दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचा संघ श्रीलंकेसाठी सोमवारी रवना झाला. त्यावेळी त्याने इंग्लंडचे खेळाडू हस्तांदोलन करण्याऐवजी फिस्ट बंप करतील असे सांगितले.
दरम्यान, इंग्लंडच्या संघाला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना पोटविकार आणि तापाने हैराण केले होते. या पर्श्वभूमीवर इंग्लंडच्या कर्णधार रुटने 'दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात आजारपणामुळे आम्ही एकमेकांना स्पर्श करण्याचे जास्ताजास्त टाळण्याचा प्रयत्न करायला हवा हे समजले आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या वैद्यकीय टीमने संसर्ग टाळण्यासाठी सक्त सुचना केल्या आहेत.' असे सांगितले.
तो पुढे म्हणाला 'आम्ही एकमेकांशी हस्तांदोलन करण्याचे टाळत आहोत. त्याऐवजी आम्ही प्रचलित फिस्ट बंपचा वापर करणार आहे. आम्ही आमचे हात दिवसातून अनेक वेळा धुणार आहेत. आम्हाला अॅन्टी बॅक्टेरियल जेल दिले आहे त्याने प्रत्येक पृष्ठभाग साफ करणार आहोत.
याचबरोबर आम्हाला कोरोना व्हायरसबद्दल जागरुक आहोत. आम्हाला दौऱ्यावर याची लागण होईल असा कोणताही शक्यता कोणीही बोलून दाखवलेली नाही. पण, आम्ही आमच्या प्रशासनाच्या सतत संपर्कात असणार आहोत. त्यांच्या सल्ल्यानुसारच आम्ही सर्व काही करु. पण, सध्या तरी आम्ही दौरा ठरल्या प्रमाणे सुरळीत होईल अशी आशा करत आहोत.'
इंग्लंडने दोन वर्षापूर्वी श्रीलंका दौऱ्यावर 3-0 असा विजय मिळवला होता. यावेळी श्रीलंका दौऱ्यावरील परिस्थिती गेल्यावेळीपेक्षा वेगळी असणार आहे असे रुटने सांगितले. तो म्हणाला 'आम्ही गेल्यावेळी तीन सामने खेळलो होतो त्यापैकी दोन सामन्यात दोन्ही संघात 60 धावांपेक्षाही कमी अंतर होते. गेल्या वेळी आम्ही श्रीलंकेत अभुतपूर्व कामगिरी केली होती. माझ्या मते त्यामुळे श्रीलंकेत कसे खेळायचे याबाबतचा आमचा आत्मविश्वास वाढला आहे.'
याचबरोबर त्याने श्रीलंकेचा संघ त्यांच्या देशात खेळताना खूप आव्हानात्मक असतो त्यामुळे त्यांना कमी लेखणार नाही. पण, आम्ही त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न नक्की करु असेही सांगितले.