

सिडनी; वृत्तसंस्था : क्रिकेटचे देव मानले जाणारे ऑस्ट्रेलियन दिग्गज सर डॉन ब्रॅडमन यांची ‘बॅगी ग्रीन’ कॅप तब्बल 4,38,550 ऑस्ट्रेलियन डॉलर्सना (सुमारे 2.40 कोटी रुपये) विकली गेली आहे. ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संग्रहालयाने हा इतिहासाचा अनमोल ठेवा म्हणून खरेदी केला आहे, ज्यामुळे क्रिकेटप्रेमींसाठी हा अनमोल वारसा देशातच जतन केला जाणार आहे.
ब्रॅडमन यांनी 1946-47 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस मालिकेत ही कॅप अर्थात टोपी परिधान केली होती. दुसर्या महायुद्धानंतर खेळली गेलेली ही पहिलीच अॅशेस मालिका होती, ज्यामुळे या कॅपला विशेष ऐतिहासिक महत्त्व आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 99.94 ची अविश्वसनीय सरासरी राखणार्या ब्रॅडमन यांच्या कारकिर्दीतील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
ऑस्टे्रलियाच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या संचालिका कॅथरीन मॅकमोहन यांनी सांगितले की, दुसर्या महायुद्धाच्या काळात लोकांच्या मनातून क्रिकेट दूर गेले होते. अशा परिस्थितीत, ही कसोटी मालिका ऑस्ट्रेलियन लोकांसाठी आशा आणि सकारात्मकतेचे प्रतीक बनली होती. सर डॉन ब्रॅडमन यांची ही ‘बॅगी ग्रीन’ कॅप केवळ एका महान फलंदाजाच्या कारकिर्दीचेच नव्हे, तर दुसर्या महायुद्धानंतरच्या निराशाजनक काळात ऑस्ट्रेलियन लोकांना प्रेरणा देणार्या क्रीडा नायकांचे प्रतिनिधित्व करते. हा राष्ट्रीय ठेवा आता संग्रहालयाच्या माध्यमातून संपूर्ण देशासाठी पाहण्यासाठी उपलब्ध होईल, याचा आम्हाला खूप आनंद आहे.
ही कॅप एका खासगी मालकाकडून खरेदी करण्यात आली आहे. ब्रॅडमन यांनी वापरलेल्या एकूण 11 ‘बॅगी ग्रीन’ कॅप्स अस्तित्वात असल्याचे मानले जाते. गेल्या वर्षी, ब्रॅडमन यांनी 1947-48 च्या भारत दौर्यावेळी वापरलेली कॅप 2,50,000 अमेरिकन डॉलर्सना विकली गेली होती. ऑस्ट्रेलियाचे कला मंत्री टोनी बर्क यांनी या खरेदीचे स्वागत करत म्हटले की, यामुळे आपण राष्ट्रीय इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग जपला आहे. डॉन ब्रॅडमन यांचे नाव ऐकले नाही, असा एकही ऑस्ट्रेलियन सापडणार नाही. आता त्यांची ही प्रतिष्ठित कॅप राष्ट्रीय संग्रहालयात आल्याने, तेथे येणार्या प्रत्येकाला आपला क्रीडा आणि सांस्कृतिक वारसा जवळून अनुभवता येईल.
ही कॅप कॅनबेरा येथील राष्ट्रीय ऐतिहासिक संग्रहात (नॅशनल हिस्टॉरीकल कलेक्शन) ठेवली जाईल. या संग्रहालयात ब्रॅडमन यांच्याशी संबंधित इतर वस्तूही आहेत, ज्यात 1934 च्या अॅशेस मालिकेतील त्यांच्या स्वाक्षरी असलेली बॅटदेखील समाविष्ट आहे. ‘विस्डेन’ने जेंटलमन्स गेममधील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून गौरवलेल्या सर डॉन ब्रॅडमन यांचे 2001 मध्ये वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. मात्र, त्यांच्या अशा अविस्मरणीय वस्तूंच्या माध्यमातून त्यांचा वारसा आजही क्रिकेटविश्वात जिवंत आहे.