

नवी दिल्ली : तब्बल 4 वर्षांनंतर आयपीएलमध्ये झालेल्या सुपर ओव्हर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सवर मात केली. दोन्ही संघांनी 20 षटकांत 188 धावा केल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये राजस्थानने प्रथम फलंदाजी केली; परंतु स्टार्कने केवळ 11 धावांच दिल्या. राजस्थानचे दोन फलंदाज 5 चेंडूतच बाद झाल्याने एक चेंडू शिल्लक राहिला. दिल्लीकडून के. एल. राहुल आणि त्रिस्टन स्टब्ज फलंदाजीस आले. राहुलने पहिल्या तीन चेंडूत 2, 4 आणि 1 अशा 7 धावा काढल्या. स्ट्राईकवर आलेल्या स्टब्जला 3 चेंडूंत 5 धावा करायच्या होत्या; परंतु त्याने मिडविकेटवरून उत्तुंग षटकार ठोकून विषय क्लोज केला.
20 षटकांच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सलग दोन पराभवानंतर अखेर विजयाची चव चाखेल असे वाटत असताना दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या चेंडूवर सामना सुपर ओव्हरमध्ये खेळण्यास भाग पाडला. राजस्थानला यशस्वी जैस्वाल व नितीश राणा यांनी विजयपथावर आणले होते; परंतु शेवटच्या षटकात स्टार्कने आपला अनुभव पणाला लावून गोलंदाजी करीत गणित बिघडवले. दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या 188 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना संजू सॅमसन व यशस्वी जैस्वाल यांनी राजस्थानला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी चौकार-षटकार खेचून दिल्लीकरांची चिंता वाढवली. पण, प्रेक्षक या आतषबाजीचाही आनंद घेत होते. पाच षटकांत या जोडीने 50 धावा फलकावर चढवल्या. सहाव्या षटकात संजूने 4, 6 ने विपराज निगमचे स्वागत केले. तिसरा चेंडू विपराजने स्टम्पपासून लांब ठेवला आणि संजू त्यावर फटका मारायला गेला. त्या प्रयत्नात त्याचा खांद्यात चमक भरली. तरीही तो मैदानावर उभा राहून एक चेंडू खेळला.
प्राथमिक उपचार घेऊनही त्याच्या वेदना कमी झाल्या नाही आणि त्याने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. संजूने 19 चेंडूंत 2 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 31 धावा केल्या होत्या. आयपीएल इतिहासात राजस्थान रॉयल्सकडून रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतलेला तो पहिला फलंदाज ठरला. त्याने यशस्वीसह 61 धावा जोडल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेला रियान पराग (8) अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. राजस्थानला 8.1 षटकांत 76 धावांवर पहिला धक्का बसला. यशस्वीने एक बाजू लावून धरली होती आणि सलग तिसरे अर्धशतक पूर्ण केले. कुलदीप यादवने त्याला बाद केले. यशस्वीने 37 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकारांसह 51 धावा केल्या. नितीश राणाने आक्रमक फटेकबाजी करून 26 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि राजस्थानला विजयासमीप पोहोचवले.
18 व्या षटकात अक्षरने त्यांचा अनुभवी गोलंदाज मिचेल स्टार्कला पुन्हा आणले आणि त्याने विकेट मिळवून दिली. अप्रतिम यॉर्करवर नितीश बाद झाला. त्याने 28 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांसह 51 धावांची खेळी केली. 12 चेंडूंत 23 धावांची गरज असताना मोहित शर्माच्या षटकांत 14 धावा निघाल्या. त्यामुळे शेवटच्या षटकात 9 धावांचे रक्षण करण्याची जबाबदारी स्टार्कवर आली. त्याने पहिल्या 4 चेंडूंवर 6 धावा दिल्या. पाचव्या चेंडूवर एक धाव आल्याने 1 चेंडू दोन धावा असा सामना चुरशीचा झाला. ध्रुववर प्रचंड दडपण होते आणि त्याला एकच धाव घेता आली. दुसरी धाव घेताना तो धावचित झाला. त्यामुळे हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. राजस्थानने 4 बाद 188 धावा केल्या.
तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 188 अशा धावा केल्या. जॅक फ्रेझर मॅकगर्क (9) व करुण नायर (0) या विकेट राजस्थानने लवकर मिळवल्या; परंतु अभिषेक पोरेल (49) व लोकेश राहुल (38) यांनी चांगली भागीदारी केली, परंतु त्यांच्या धावगतीला अपेक्षित वेग नव्हता. कर्णधार अक्षर पटेलने 14 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह 34 धावा चोपल्या. त्यानंतर त्रिस्टन स्टब्स व आशुतोष शर्मा यांनी मोर्चा सांभाळला. स्टब्स 18 चेंडूंत 2 चौकार व 2 षटकारांसह 34 धावांवर नाबाद राहिला. शर्मा 15 धावांवर नाबाद राहिला आणि दिल्लीने 5 बाद 188 धावांपर्यंत मजल मारली.
दिल्ली कॅपिटल्स : 20 षटकांत 5 बाद 188 धावा. (अभिषेक पोरेल 49, के.एल. राहुल 38. जोफ्रा आर्चर 2/32)
राजस्थान रॉयल्स : 20 षटकांत 4 बाद 188 धावा. (नितिश राणा 51, संजू सॅमसन 31. मिचेल स्टार्क 1/36)