

दुबई; वृत्तसंस्था : ‘आयसीसी’च्या ताज्या महिला टी-20 गोलंदाजी मानांकनात भारताची अनुभवी अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माचे वर्चस्व कायम असून, ती पहिल्या स्थानावर विराजमान आहे. तिच्या जोडीला वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूरनेही अव्वल 10 मध्ये पुनरागमन केले आहे. कारकिर्दीत तिसर्या क्रमांकापर्यंत पोहोचलेल्या रेणुकाने आठ स्थानांची झेप घेत संयुक्त सहावे स्थान गाठले. तिने तिसर्या सामन्यात 21 धावांत 4 बळी घेत भारताच्या मालिका विजयात मोलाची भूमिका बजावली होती.
फलंदाजीत आक्रमक सलामीवीर शफाली वर्माने सहाव्या स्थानी झेप घेतली. श्रीलंकेविरुद्ध सलग अर्धशतकी खेळी साकारल्यानंतर याचे प्रतिबिंब मानांकनात उमटले. 21 वर्षीय शफालीने तब्बल चार स्थानांची प्रगती केली. तिने तिरुवनंतपूरम येथे पार पडलेल्या दुसर्या टी-20 सामन्यात 34 चेंडूंत नाबाद 69, तर तिसर्या आणि चौथ्या सामन्यांत अनुक्रमे 42 चेंडूंत 79 आणि 46 चेंडूंत नाबाद 79 धावांचे तडाखेबंद डाव साकारले.
संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने चौथ्या टी-20 सामन्यात 80 धावांची खेळी करत आपला फॉर्म परत मिळवला असून, तिने मानांकनात आपले तिसरे स्थान कायम राखले आहे. दुसरीकडे, जेमिमा रॉड्रिग्स एका स्थानाने घसरून 10 व्या क्रमांकावर आली आहे.